मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ३७ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. रविवारी (२४ एप्रिल) झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सला ३६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा मुंबईचा आयपीएल २०२२ मधील सलग ८ वा पराभव ठरला. त्यामुळे त्यांच्या नावावर आयपीएल हंगामातील पहिल्या सलग ८ सामन्यांत पराभवाचा नकोसा विक्रमही नोंदवला गेला. संघाचा या कामगिरीमुळे कर्णधार रोहित शर्मा निराश झाला आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्सला लखनऊ सुपर जायंट्सने (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) १६९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला २० षटकांत ८ बाद १३२ धावाच करता आल्या.
मुंबईच्या या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, ‘मला वाटते आम्ही चांगली गोलंदाजी केली होती. हे सोपे नव्हते, कारण या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे होते. मला वाटते आव्हान पार व्हायला हवे होते, पण आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. जेव्हा तुमच्यासमोर असे लक्ष्य असते, तेव्हा तुम्ही चांगली भागीदारी करणे आवश्यक असते. पण आम्ही काही बेजबाबदार शॉट खेळले, ज्यात मी देखील सामील आहे. त्यामुळे आम्हाला लय मिळाली नाही. त्यांनी चांगली गोलंदाजी केली.’
त्याचबरोबर आयपीएलच्या १५ व्या हंगामातीलच कामगिरी चांगली नसल्याचे रोहितने मान्य केले. रोहित म्हणाला, ‘आम्ही या संपूर्ण स्पर्धेतच चांगली फलंदाजी केली नाही. जो कोणी खेळपट्टीवर असतो, त्याने जबाबदारी घेऊन मोठी खेळी करणे गरजेचे आहे. काही प्रतिस्पर्धी खेळाडूंनी तसेच केले आहे, ज्यामुळे आम्हाला पराभूत व्हावे लागले. एकाने तरी जेवढी शक्य होईल, तेवढी मोठी खेळी खेळायला हवी.’
त्याचबरोबर रोहित म्हणाला, ‘आमच्या अपेक्षेप्रमाणे या हंगामात कामगिरी झाली नाही, पण अशा गोष्टी होत राहतात.’
मुंबई इंडियन्सचा पराभव
या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने कर्णधार केएल राहुलच्या नाबाद १०३ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ६ बाद १६८ धावा केल्या. मुंबईकडून राईल मेरिडीथ आणि कायरन पोलार्ड यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक ३९ धावा केल्या, तसेच तिलक वर्माने ३८ धावा केल्या. बाकी कोणाला २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. त्यामुळे मुंबईला २० षटकांत १३२ धावाच करता आल्या आणि ३६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. लखनऊकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईविरुद्ध २ धावा अन् शिखर गाठणार आयपीएलमधील मोठा पल्ला, केवळ विराटलाच जमलाय ‘तो’ विक्रम
मुंबईविरुद्ध मॅच जिंकली, शतक केलं, तरी केएल राहुलला २४ लाखांचा दंड; वाचा नक्की काय केली चूक
इशानचं नशीबच फुटकं! बिश्नोईच्या चेंडूवर विचित्र पद्धतीने झाला बाद, पाहणारा प्रत्येकजण हैराण