चेन्नई । भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एमएस धोनीचे महत्त्व अधोरेखित करताना धोनीच्या भविष्यावर होणाऱ्या चर्चेला एकप्रकारे पूर्णविराम दिला आहे.
संघ व्यवस्थापन एमएस धोनीला कधीही संघातून वगळण्याचा विचार देखील करू शकत नाही असेही शास्त्री पुढे म्हणाले. सध्याच्या धोनीचा फिटनेस आणि फॉर्ममुळे त्याला २०१९ साली होणाऱ्या विश्वचषकात नक्की स्थान मिळेल याबद्दल शास्त्री यांना कोणतीही शंका नाही.
शास्त्री यांनी धोनीचे कौतुक करताना त्याची तुलना सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि कपिल देव या दिग्गजांशी केली. शिवाय त्याने केलेल्या कामगिरीचा आदर केला पाहिजे असेही पुढे म्हटले आहे.
शास्त्री म्हणतात, ” तुम्हाला धोनीसारखा महान खेळाडू शोधून सापडणार नाही. धोनी सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि कपिल देव या वर्गातील आहे. आपण त्याने आजपर्यंत केलेल्या कामगिरीचा आदर केला पाहिजे. ”
“खेळाडूचे मूल्यमापन हे त्याचा फिटनेस आणि सध्याचा फॉर्म यावर होते आणि धोनीकडे ह्या दोनही गोष्टी आहेत. त्याचे यष्टिरक्षण हे वनडे क्रिकेटमध्ये अफलातून आहे. त्याने श्रीलंकेत केलेली फलंदाजी हा केवळ ट्रेलर होता पूर्ण चित्रपट बाकी आहे. ” असेही शास्त्री म्हणाले.