मंगळवारी (२८ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकणे आवश्यक होते. या महत्वाच्या सामन्यात सौरभ तिवारीने ४५ धावांची महत्वाची खेळी केली होती. ज्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला ६ गडी राखून विजय मिळवण्यात यश आले होते. हा सामना झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सौरभ तिवारीचे तोंडभरून कौतुक केले. यासह ईशान किशनबद्दल देखील भाष्य केले.
मुंबई इंडियन्स संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन याची आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. परंतु आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याला दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या ३ सामन्यात संधी देण्यात आली होती. परंतु तो चांगली कामगिरी करू शकला नाही. ज्यामुळे चौथ्या सामन्यात रोहितने टोकाची भूमिका घेत, त्याला संघाबाहेर करून सौरभ तिवारीला संधी देण्याचा निर्णय घेतला होता.
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ अडचणीत असताना सौरभ तिवारीने महत्वाची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या खेळीनंतर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश झाला आहे. रोहितने सामना झाल्यानंतर म्हटले की, “ईशानला संघाबाहेर ठेवणे हा एक कठीण निर्णय होता, पण आम्हाला असे वाटले की संघात बदल करण्याची गरज होती. तो एक अप्रतिम युवा खेळाडू आहे. पण अजून त्याच्यासाठी संघाचे दार बंद झाले नाहीये. सौरभ तिवारीने चेन्नईविरुद्ध अर्धशतक झळकावले होते आणि आजही त्याने मधल्या षटकांमध्ये अप्रतिम फलंदाजी केली.”
आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात ईशान किशन फ्लॉप
ईशान किशनने आतापर्यंत आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात ३ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला अवघ्या ३४ धावा करण्यात यश आले आहे. तर आयपीएल २०२१ स्पर्धेत त्याने ८ सामन्यात १०७ धावा केल्या आहेत. या दरम्यान २८ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. तर आयपीएल २०२० स्पर्धेत त्याने १४ सामन्यात ४ अर्धशतकांच्या साहाय्याने ५१६ धावा केल्या होत्या.
सौरभ तिवारीचे विजयात महत्त्वाचे योगदान
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाब किंग्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना ऍडन मार्करमने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली होती. तर दीपक हुड्डाने २८ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्स संघाला ६ षटक अखेर १३५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना सौरभ तिवारीने सर्वाधिक ४५ धावांचे योगदान दिले होते. तर हार्दिक पंड्याने तुफान फटकेबाजी करत नाबाद ४० धावांचे योगदान दिले आणि मुंबई इंडियन्स संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर हास्य परतलं; सलग ३ पराभवांनंतर मुंबईच्या ताफ्यात आनंदाची लहर, रितीका-नताशाचीही खुलली कळी
VIDEO: जब मिले दो जिगरी यार! कोलकाता-दिल्ली सामन्यापूर्वी मैदानावर शिखरची हरभजनला कडाडून मिठी
अगग! बिश्नोईने अवघ्या ८ धावांवर रोहितला दाखवला पव्हेलियनचा रस्ता, लाजिरवाण्या विक्रमात बनला नंबर १