मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात बुधवारी (११ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. डॉ. डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ८ विकेट्सने विजय मिळवला. या विजयानंतर प्लेऑफच्या शर्यतीत दिल्लीने आपले स्थान आणखी पक्के केले आहे. पण, या शर्यतीत त्यांना राजस्थान रॉयल्सचीही कडवी टक्कर आहे. पण, बुधवारी झालेल्या पराभवामुळे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन निराश दिसला.
दिल्लीने मिळवला विजय
या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी केली. राजस्थान रॉयल्सकडून आर अश्विनने (R Ashwin) ३८ चेंडूत ५० धावांची खेळी केली. त्याला देवदत्त पडीक्कलने चांगली साथ दिली. पडीक्कलने ३० चेंडूत ४८ धावा केल्या. त्यामुळे राजस्थानला २० षटकात ६ बाद १६० धावा करता आल्या. दिल्लीकडून चेतन साकारिया, एन्रीच नॉर्किया आणि मिशेल मार्श यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या (Rajasthan Royals vs Delhi Capitals).
तसेच, त्यानंतर १६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्ससाठी मिशेल मार्शने (Mitchell Marsh) सर्वाधिक धावा केल्या. त्याने ६२ चेंडूत ८९ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ७ षटकार मारले. तसेच डेव्हिड वॉर्नरने ४१ चेंडूत नाबाद ५२ धावांची खेळी केली, तर रिषभ पंतने ४ चेंडूत नाबाद १३ धावा केल्या. त्यामुळे दिल्लीने १८.१ षटकातच २ बाद १६१ धावा करत सामना आपल्या नावावर केला. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
१५-२० धावा कमी पडल्या – संजू सॅमसन
या सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) म्हणाला, ‘खूपच निराशाजनक. आम्ही काही धावा कमी बनवल्या आणि मधल्या षटकात काही विकेट्स घेऊ शकलो नाही. जेव्हा आम्ही फलंदाजी करत होतो, तेव्हा खेळपट्टी वेगवान होती. आम्ही १५-२० धावा कमी केल्या. नंतर क्षेत्ररक्षणही खराब राहिले. आम्ही काही झेल देखील सोडले. खंरच मी खूप निराश आहे. पण आम्ही पुढच्या सामन्यात पुनरागमन करू इच्छितो.’
‘आम्हाला आयपीएलमध्ये कोणताही सामना पराभूत झाल्यानंतर मजबूत पुनरागमन करण्याची गरज आहे. मला आशा आहे की आम्ही चांगली पुनरागमन करू. आम्ही भूतकाळात असे केले आहे,’ असेही सॅमसन पुढे म्हणाला.
राजस्थानने आत्तापर्यंत आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) १२ पैकी ७ सामने जिंकले आहेत आणि ५ पराभूत झाले आहेत, त्यामुळे १४ गुणांसह राजस्थान गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच दिल्लीने १२ पैकी ६ सामने जिंकले असून ६ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे दिल्ली १२ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. या गुणतालिकेत १८ गुणांसह गुजरात टायटन्स अव्वल क्रमांकावर असून प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. तसेच लखनऊ सुपर जायंट्स १६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
प्रेमासाठी काहीही! विराट अनुष्कासाठी चाहत्यांनाही चकमा देत गेला बंगळुरूच्या बेकरीत अन् पुढे…
जडेजा-चेन्नई फ्रँचायझींनी सोशल मीडियावर एकमेंकांना केलं अनफॉलो, सीइओ म्हणतायेत…
आजच्याच दिवशी सीएसकेला धुळ चारत मुंबई इंडियन्स ठरली होती आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम