बरोबर ३ वर्षांपूर्वी १२ मे २०१९ ला आयपीएलच्या १२ व्या मोसमाचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात हैद्राबाद येथे पार पडला होता. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने १ धावेने विजय मिळला आणि चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवण्याचा इतिहास रचला. त्यावेळी ४ आयपीएल विजेतेपद जिंकणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला.
त्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ चौथे आयपीएल विजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरले होते. कारण त्या सामन्याआधी दोन्ही संघांनी प्रत्येकी ३ आयपीएल विजेतेपद मिळवले होते.
अखेर या सामन्यात मुंबई इंडियन्स यशस्वी ठरला आणि ते चौथ्या विजेतेपदासह आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ ठरले. विशेष म्हणजे मुंबईने ही चारही विजेतेपदं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मिळवली आहेत.
#VIVOIPL 2019 Champions ???? – @mipaltan ???? pic.twitter.com/XPl5dzh2H6
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2019
या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १४९ धावा केल्या होत्या. मुंबईकडून अष्टपैलू किरॉन पोलार्डने सर्वाधिक नाबाद ४१ धावा केल्या. तसेच कर्णधार रोहित शर्मा(१५) आणि क्विंटॉन डिकॉकने(२९) मुबंईला चांगली सुरुवात करुन दिली होती. त्यांनी ४५ धांवाची सलामी भागीदारी केली होती.
पण नंतर मुंबईचे फलंदाज नियमित अंतराने बाद झाले. चेन्नईकडून दिपक चहरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच इम्रान ताहिर आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर १५० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सला फाफ डू प्लेसिस आणि शेन वॉट्सनने चांगली सुरुवात दिली. डु प्लेसिसने चांगली सुरुवात करताना १३ चेंडूत २६ धावांची खेळी केली. या छोटेखानी खेळीत त्याने ३ चौकार आणि १ षटकार मारला.
पण तो बाद झाल्यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमवायला सुरुवात केली. पण असे असले तरी एका बाजूने वॉट्सन खेळत होता. त्याने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले.
शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी ९ धावांची आवश्यकता होती. तसेच त्यांच्याकडे ५ विकेट्स हातात होत्या. त्यावेळी रोहितने लसिथ मलिंगाकडे चेंडू सोपवला. यावेळी चेन्नईकडून वॉट्सन आणि जडेजा फलंदाजी करत होते. त्यांनी पहिल्या ३ चेंडूंवर ४ धावा काढल्या.
मात्र चौथ्या चेंडूवर वॉट्सन दुहेरी धावा धावताना नाट्यपूर्ण पद्धतीने धावबाद झाला. त्याने ५९ चेंडूत ८० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ४ षटकार मारले.
पण वॉट्सन बाद झाल्यानंतर चेन्नईसमोर २ चेंडू ४ धावा असे समीकरण होते. तसेच वॉट्सन बाद झाल्याने शार्दुल ठाकूर फलंदाजीसाठी आला होता. त्याने पाचव्या चेंडूवर जडेजासह २ धावा पळून काढल्या. मात्र शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना मलिंगाच्या यॉर्करवर तो पायचित झाला आणि मुंबई संघाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
विशेष म्हणजे १ धावेने अंतिम सामना जिंकण्याची मुंबई इंडियन्सची ही दुसरी वेळ होती. त्यांनी २०१७ च्या आयपीएलच्या अंतिम सामन्यातही रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध १ धावेने विजय मिळवला होता.
तसेच नमुद करण्यासारखी गोष्ट अशी की १२ व्या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघ अंतिम सामन्यासह ४ वेळा आमने सामने आले होते. या चारही सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी स्वत:च्या राष्ट्रीय संघाला नकार देणारा ‘कायरन पोलार्ड’
Video: नागरकोटी बनला ‘सुपरमॅन’, डाईव्ह मारक पडकला पडीक्कलचा अवघड कॅच
रियान पराग निघाला राजस्थानचा ‘डॉन’, दिल्लीच्या घातक गोलंदाजाच्या भेदक चेंडूवर मारला ९६ मीटरचा षटकार