भारत देशात सध्या कोरोना व्हायरस महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या महामारीचा फटका गोरगरिबांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींनाही बसत आहे. क्रिकेटक्षेत्रही याला अपवाद नाही. आतापर्यंत बऱ्याचशा आजी-माजी क्रिकेटपटूंनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे. नुकतेच (०८ मे) राजस्थान रॉयल्सचा युवा शिलेदार चेतन सकारिया याचे वडील कांजीभाई सकारिया यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. या दु:खद वृत्तानंतर राजस्थान संघ सकारियाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे.
आयपीएल २०२१ स्थगित होण्याच्या काही दिवसांपुर्वी सकारियाचे वडील कांजीभाई यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे गुजरातमधील भावनगर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. अखेर रविवारी (०९ मे) त्यांनी शेवटचा श्वास घेतला. यानंतर क्रिकेटविश्वातून हळहळ व्यक्त होत असताना राजस्थान संघाने सकारिया व त्याच्या कुटुंबाला धीर देण्याचे काम केले आहे.
राजस्थान संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत लिहिले आहे की, ‘कांजीभाई सकारिया हे आज कोरोनाविरुद्धच्या लढाईत पराभूत झाले असल्याचे कळवण्यात आम्हाला फार दु:ख होत आहे. आम्ही चेतनच्या संपर्कात आहोत. आमच्यापरीने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला या कठीण काळात शक्य तितकी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करु.’
It pains us so much to confirm that Mr Kanjibhai Sakariya lost his battle with Covid-19 earlier today.
We're in touch with Chetan and will provide all possible support to him and his family in this difficult time.
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 9, 2021
वडिलांपुर्वी गमावले होते भावाला
दुर्दैवाची बाब म्हणजे, सकारियाने आपल्या वडिलांना गमावण्याच्या काही महिन्यांपुर्वीच आपला भाऊ राहुल सकारियाला गमावले होते. राहुलने काही कारणास्तव आत्महत्या केली होती.
आयपीएल २०२१ मध्ये प्रभावी कामगिरी
अवघ्या २० लाखांच्या मुळ किंमतीसह आयपीएल २०२१ लिलावात उतरलेल्या सकारियाला राजस्थान रॉयल्सने १.२० कोटींना विकत घेतले होते. या हंगामात ७ सामने खेळताना त्याने एकूण ७ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या ३१ चेंडूवर ३ विकेट्सचाही समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थान रॉयल्सच्या चेतन सकारियावर कोसळला दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे जिवलग वडिलांचे निधन