वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलनं निवृत्तीचे संकेत दिले आहेत. तो सध्या सुरू असलेल्या टी20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकू शकतो. रसेलनं म्हटलं आहे की, जर वेस्ट इंडिजनं टी20 विश्वचषक स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर तो निवृत्त झाला तर ही त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल.
जर आपण आंद्रे रसेलबद्दल बोललो तर तो वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू आहे. त्याने कॅरेबियन संघासाठी आतापर्यंत 1 कसोटी, 56 एकदिवसीय आणि 77 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तो अनेक वर्षांपासून वेस्ट इंडिजकडून खेळत असून त्याची कामगिरी सातत्यानं चांगली राहिली आहे.
यावेळी 2024 टी20 विश्वचषकाचं आयोजन वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. आंद्रे रसेलला त्याच्या मायभूमीवर विश्वचषक जिंकून निवृत्ती घ्यायची आहे. तो म्हणाला, “हा विश्वचषक जिंकणं आणि त्यानंतर निवृत्त होणं, हे माझ्यासाठी अभिमानास्पद असेल.” वेस्ट इंडिजनं या टी20 विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली असून संघानं आपले पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. ते सुपर 8 मध्ये जाण्यासाठीचे प्रबळ दावेदार आहेत.
गयाना येथे रविवारी खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या 18 व्या सामन्यात वेस्ट इंडिजनं युगांडाचा 134 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कॅरेबियन संघानं निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 173 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, युगांडाचा संघ केवळ 39 धावांत गारद झाला. टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील ही सर्वात कमी संयुक्त धावसंख्या आहे. वेस्ट इंडिजकडून अकिल हुसैननं आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकात केवळ 11 धावा देत 5 बळी घेतले.
या सामन्यात अष्टपैलू आंद्रे रसेलनंही शानदार कामगिरी केली. रसेलनं खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत 17 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या आणि यानंतर गोलंदाजीतही त्यानं 1 षटकात केवळ 4 धावा देत 1 बळी घेतला.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकादरम्यान पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तारखा जाहीर, 20 दिवस चालणार स्पर्धा
खेळाडूंमधील बाचाबाची, चाहत्याला मारहाण; भारत-पाकिस्तान सामन्यांतील टॉप 5 वाद
आरसीबी फॅन्ससाठी आनंदाची बातमी! युगांडाचा संघ अवघ्या 39 धावांवर ऑलआऊट