न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महिला विश्वचषक २०२२ चा (ICC Women World Cup 2022) थरार सुरू आहे. शनिवारी (१२ मार्च) हॅमिल्टन येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात विश्वचषकातील दहावा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ८ बाद ३१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ ४०.३ षटकातच १६२ धावांवर गारद झाला. परिणामी वेस्ट इंडिजने १५५ धावांनी हा सामना गमावला. यासह भारतीय संघाने वेस्ट इंडिजला त्यांच्या सलग तिसऱ्या विजयापासून रोखले आहे. तर आपला स्पर्धेतील दुसरा विजयही नोंदवला आहे.
या पराभवाच्या धक्क्यानंतर वेस्ट इंडिजच्या संघाला अजून एक धक्का बसला आहे. वेस्ट इंडिजच्या संघाने भारताविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती कमी राखल्यामुळे (Slow Over Rate) त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (आयसीसी)ने दंड ठोठावला (ICC Fined West Indies) आहे.
वेस्ट इंडिजच्या संघावर सामना फीच्या ४० टक्के दंड आकारला गेला आहे. आयसीसीच्या एलिट पॅनेलमधील सामना रेफरी शांड्रे फ्रिट्स यांनी स्टिफनी टेलरच्या नेतृत्त्वाखालील वेस्ट इंडिज संघावर हा दंड ठोठावला आहे. त्यांनी निर्धारित वेळेत ५० षटके फेकली नव्हती. त्यामुळे निर्धारित वेळेत २ षटके कमी फेकली गेली. यामुळे सामना रेफरींनी त्यांच्यावर हा दंड आकारला आहे.
आयसीसीच्या आचार संहितेच्या कलम २.२२ नुसार, खेळाडूंवर षटकांची गती कमी राखण्यासाठी दंड लावला जातो. जर संघाने एक षटक कमी फेकले तर त्यांच्यावर सामना फीच्या २० टक्के दंड लावला जातो. तर २ षटकांसाठी सामना फीच्या ४० टक्के पैसे कापले जातात.
वेस्ट इंडिजची कर्णधार स्टिफनी टेलर हिने संघावरील सर्व आरोपांचा स्विकार केला आहे. त्यामुळे या प्रकरणावर कोणती सुनावणी करण्याची गरज पडली नाही. मैदानी पंच इलोइस शेरिडन आणि पॉल विल्सन, तिसरे पंच अहमद शाह पकतीन व चौथे पंच रुचिरा पल्लियागुरगे यांनी वेस्ट इंडिजवर षटकांची गती कमी राखण्याचे आरोप केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी दर्शकांकडून ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे जोरदार स्वागत, पण तो आला तसाच गेला; पाहा काय झालं?
‘नॅशनल क्रश’ स्म्रीती मंधना करतेय ‘या’ गायकाला डेट? त्यानेही हातावर गोंदलय ‘एसएम१८’
दुसऱ्या कसोटीत विराटने केले असे काही की, चाहत्यांनी दिले त्याच्या अन् डिविलियर्सच्या नावाचे नारे