न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ चा थरार (ICC Women ODI World Cup 2022) सुरू आहे. या विश्वचषकातील सातवा सामना बुधवारी (०९ मार्च) इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज (ENGW vs WIW) यांच्यात झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने निर्धारित ५० षटकांत ६ बाद २२५ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ४८ षटकांमध्येच २१८ धावांवर सर्वबाद झाला. परिणामी वेस्ट इंडिजने ७ धावांनी हा सामना जिंकला. हा त्यांचा स्पर्धेतील सलग दुसरा विजय (West Indies Consecutive Second Win) होता, तर इंग्लंडल सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली होती. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी झटपट धावा करत संघाची धावसंख्या २२५ वर नेली. वेस्ट इंडिजकडून यष्टीरक्षक शेमेन कॅम्पेबेल हिने सर्वाधिक ६६ धावा केल्या. ८० चेंडूंमध्ये ४ चौकारांच्या मदतीने तिने ही अर्धशतकी खेळी केली. तिच्याबरोबरच चिडन नेशनने नाबाद ४९ आणि हिली मॅथ्यूजने ४५ धावांचे योगदान दिले. तसेच सलामीवीर डेंड्रा डॉटिन हिनेही ३१ धावा जोडल्या.
या डावात इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोन हिने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. १० षटके गोलंदाजी करताना २० धावा देत तिने या विकेट्स काढल्या. तसेच नताली स्कॅव्हियर हिने एका वेस्ट इंडिजच्या फलंदाजाला बाद केले.
WEST INDIES WIN BY 7 RUNS! 👏
What a nail-biting finish. Incredible! 🔥#CWC22 pic.twitter.com/izEGqaZSaI
— ICC (@ICC) March 9, 2022
वेस्ट इंडिजच्या २२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ २१८ धावात करू शकला. इंग्लंडकडून सलामीवीर टॅमी बाउमॉटने सर्वाधिक ४६ धावा चोपल्या. तर सोफी डंक्ले (३८ धावा), सोफी इक्लेस्टोन (३३ धावा) आणि डॅनियल वॉट (३३ धावा) यांनाच ३० धावांचा आकडा ओलांडता आला. इंग्लंडच्या इतर फलंदाज साध्या ३० धावाही करू शकल्या नाहीत.
वेस्ट इंडिजकडून शमिला कॉनेल हिने शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले. तिने १० षटकात ३८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच हिली मॅथ्यूज आणि हनिसा मोहम्मद यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत इंग्लंडला सर्वबाद करण्यात हातभार लावला.
या सामना विजयासह वेस्ट इंडिजचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर इंग्लंडचा संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला, पण मिताली-मंधानाच्या क्रमवारीत ‘इतक्या’ स्थानांची घसरण
आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेल्या लखनऊ संघाची काय आहे ताकद अन् कमजोरी, जाणून घ्या सर्वकाही
पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा: ऑल स्टार्स संघाची वॉरियर्स संघावर दोन धावांनी मात