सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज (INDvWI) विरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळत आहे. अहमदाबाद येथे झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने निर्भेळ यश मिळवत ३-० असा मालिका विजय साजरा केला. त्यानंतर आता उभय संघांमध्ये कोलकाता येथील ईडन गार्डन्समध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाईल. त्याच वेळी ही मालिका भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची अखेरची संधी असल्याचे म्हटले जात आहे.
भुवनेश्वरसाठी अखेरची संधी
आपल्या स्विंग गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा भुवनेश्वर मागील काही काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. सातत्याने होणाऱ्या दुखापती व अनियंत्रित गोलंदाजीमुळे त्याला अनेकदा टीकेचा सामना करावा लागला आहे. २०२० व २०२१ आयपीएलचे तो पुर्ण हंगाम खेळू शकला नव्हता. तरी देखील त्याला टी२० विश्वचषकासाठी संधी देण्यात आली होती. विश्वचषक व न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संमिश्र कामगिरी केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत तो अपयशी ठरला होता. त्यामुळे त्यासाठी ही मालिका स्वतःला सिद्ध करण्याची अखेरची संधी असल्याचे मानले जात आहे.
इतर गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी
सध्या भारतीय संघातील इतर वेगवान गोलंदाज उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. जसप्रीत बुमराह, दीपक चहर व मोहम्मद सिराज अप्रतिम फॉर्ममध्ये आहेत. तर शार्दुल ठाकुर, आवेश खान व प्रसिद्ध कृष्णा या गोलंदाजांनीही लक्ष वेधून घेतले आहे.
बीसीसीआयची कठोर भूमिका
खराब कामगिरी करणाऱ्या वरिष्ठ खेळाडूंसाठी बीसीसीआयने मागील काही काळापासून कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. कसोटी संघातील फलंदाज अजिंक्य राहणे व चेतेश्वर पुजारा यांना रणजी ट्रॉफीमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर इशांत शर्मा व वृद्धिमान साहा यांनादेखील आगामी कसोटी मालिकेसाठी संघात स्थान दिले जाणार नाही अशी माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
“भारत-पाकिस्तान सामन्यासाठी व्हा तयार” पाकिस्तानी कर्णधाराची ललकारी (mahasports.in)
“इंग्लंडने आपल्या खेळाडूंना आयपीएल खेळण्यापासून रोखावे” (mahasports.in)