ढाका येथील शेरे बांगला स्टेडियम मध्ये खेळल्या गेलेल्या बांगलादेश विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज संघाने बांगलादेश संघावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. २३१ धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघ अवघ्या २१३ धावाच करू शकला. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाने १७ धावांनी विजय मिळवला.
पहिल्या कसोटी सामन्यात काईल मेयर्स याने केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे वेस्ट इंडिज संघ पहिला कसोटी सामना जिंकू शकला होता. तसेच आता दुसरा सामना जिंकत वेस्ट इंडिज संघाने २-० ने मालिका आपल्या नावावर केली आहे.
अटीतटीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज संघाने बांगलादेश संघाचे ९ गडी अवघ्या १८८ धावांवर बाद केले होते. असे वाटू लागले होते की वेस्ट इंडिज संघ एकहाती विजय मिळवेल. परंतु पुढील ३० मिनिट एकही गडी बाद झाला नाही. त्यानंतर ५९ व्या षटकात मेहदी हसन याने आक्रमक रूप धारण करत कॉर्नवॉल याच्या चेंडूवर षटकार मारला आणि त्यानतंर एक चौकार देखील मारला. इथून सामना फिरेल की काय असे वाटत असतानाच, फिरकी गोलंदाज जोमेल वॉरिकन याच्या चेंडूवर मेहदी हसन स्लीप मध्ये झेलबाद झाला आणि वेस्ट इंडिजने सामना जिंकला.
शेवटच्या क्षणी बांगलादेशचा पराभव
दुसऱ्या सामन्यात २३१ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशकडून पहिल्या विकेटसाठी तमिम इकबाल आणि सौम्य सरकार यांनी मिळून ५९ धावा केल्या. त्यानंतर सौम्य सरकार १३ धावा आणि इकबाल ५० धावा करत माघारी परतले. बांगलादेश संघाचा अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीम आणि मिथुन यांना साजेशी कामगिरी करता आली नाही. तसेच मोमिनुल हकने २६ धावांची खेळी केली. सामना अटीतटीचा होत होता. अशातच मेहदी हसन आणि लीटण दास यांनी बांगलादेश संघाला विजयापर्यंत नेले परंतु शेवटच्या क्षणी मेहदी हसन बाद झाला आणि वेस्ट इंडिज संघाने १७ धावांनी सामना आपल्या नावावर केला.
वेस्ट इंडिजकडून या डावात राहकिम कॉर्नवॉलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर जोमेल वॉरिकन आणि क्रेग ब्रेथवेटने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
वेस्ट इंडिजला मिळाली होती आघाडी
या सामन्यात वेस्ट इंडिजने पहिल्या डावात सर्वबाद ४०९ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून बॉनेर(९०), जोशुआ डी सिल्वा(९२) आणि अल्झारी जोसेफ(८२) यांनी अर्धशतके केली. बांगलादेशकडून अबू जायेत आणि तैजुब इस्लाम यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव २९६ धावांवर उरकला. त्यामुळे वेस्ट इंडिजने ११३ धावांची आघाडी घेतली. या डावात बांगलादेशकडून रहिम(५४), लिटॉन दास(७१) आणि मेहदी हसनने(५७) अर्धशतके केली. या डावात वेस्ट इंडिजकडून राहकिम कॉर्नवॉलने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजकडून बॉनेरने सर्वाधिक ३८ धावा केल्या. हा डाव ११७ धावांवर संपुष्टात आला. मात्र पहिल्या डावातील ११३ धावांच्या आघाडीसह वेस्ट इंडिजने बांगलादेशला २३१ धावांचे आव्हान दिले.
महत्त्वाच्या बातम्या –
आर अश्विनच्या गोलंदाजीविरुद्ध शुन्यावर बाद तर झालाच पण ब्रॉडने ‘हा’ नकोसा विक्रमही केला
रिषभ पंतचा ‘तो’ षटकार पाहून कर्णधार विराट कोहलीही झाला अवाक्, पाहा व्हिडिओ
Valentines Day Special : ३ मुलींवर जडला होता जाॅंटी रोड्सचा जीव, जिच्याशी लग्न केले ती होती…