आज(१२ जुलै) वेस्ट इंडिजने इंग्लंड विरुद्ध साऊथँम्पटन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ४ विकेट्सने विजय मिळवत ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजच्या या विजयात जर्मेन ब्लॅकवूडने महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने या सामन्याच्या दुसऱ्या डावात ९५ धावांची खेळी केली आहे.
या सामन्यात आज म्हणजेच पाचव्या दिवशी इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात ३१३ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे त्यांनी पहिल्या डावातील ११४ धावांच्या पिछाडीसह वेस्ट इंडिजला २०० धावांचे आव्हान दिले.
या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली होती. त्यांनी २७ धावांवरच ३ विकेट्स गमावल्या होत्या. तसेच जॉन कॅम्पबेल दुखापतग्रस्त झाल्याने रिटायर्ट हर्ट होऊन बाहेर पडला होता.
अशा बिकट परिस्थितीत रोस्टन चेस आणि ब्लॅकवूडने वेस्ट इंडिज संघाचा डाव सांभाळत चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. पण अखेर ही भागीदारी तोडण्यात जोफ्रा आर्चरला यश आहे. त्याने रोस्टन चेसला ३७ धावांवर बाद केले. परंतू त्यानंतरही ब्लॅकवूडने यष्टीरक्षक फलंदाज शेन डावरिचला साथीला घेत ५ व्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी रचली.
पण इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने डावरिचला २० धावांवर बाद करत सामन्यात रोमांच आणला. परंतू तोपर्यंत वेस्ट इंडिज संघ विजयाच्या जवळ पोहतला होता. वेस्ट इंडिज विजयाच्या अगदी समीप असताना ब्लॅकवूडला स्टोक्सने बाद केले. ब्लॅकवूडने १५४ चेंडूत १२ चौकारांसह ९५ धावा केल्या.
तो बाद झाल्यानंतर दुखापतग्रस्त कॅम्पबेल पुन्हा फलंदाजीसाठी आला. अखेर कर्णधार जेसन होल्डरने त्याच्या मदतीने वेस्ट इंडिजला २०० धावांचे आव्हान पार करुन दिले. तसेच होल्डरने १४ नाबाद धावा केल्या. तर कॅम्पबेल ८ धावांवर नाबाद राहिला.
या डावात इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त बेन स्टोक्सने २ विकेट्स आणि मार्क वूडने १ विकेट घेतली.
तत्पूर्वी या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद २०४ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून स्टोक्सने सर्वाधिक ४३ धावा केल्या होत्या. तर वेस्ट इंडिजकडून गोलंदाजी करताना या डावात होल्डरने ६ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात क्रेग ब्रेथवेट(६५) आणि शेन डावरिचच्या(६१) अर्धशतकाच्या जोरावर सर्वबाद ३१८ धावा केल्या आणि ११४ धावांची आघाडी घेतली. या डावात इंग्लंडकडून गोलंदाजी करताना स्टोक्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
इंग्लंडकडून दुसऱ्या डावात डोम सिब्ले(५०) आणि झॅक क्राऊलेने (७६) अर्धशतके झळकावली. तसेच बेन स्टोक्सने ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला ३१३ धावसंख्या गाठण्यात यश आहे. या डावात वेस्ट इंडिजकडून शेनन गॅब्रियलने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक –
इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद २०४ धावा
वेस्ट इंडिज पहिला डाव – सर्वबाद ३१८ धावा
इंग्लंड दुसरा डाव – सर्वबाद ३१३ धावा
वेस्ट इंडिज दुसरा डाव – ५ बाद २०४ धावा
ट्रेंडिंग घडामोडी –
जोफ्रा आर्चरच्या खतरनाक चेंडूवर हा फलंदाज झाला घायाळ; तुटला अंगठा?
आता भर पावसात सुरु राहणार क्रिकेटचा सामना, भारतात सुरु आहे सर्वात हायटेक स्टेडियमचे काम
सौराष्ट्राला रणजी ट्रॉफी मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केलेला ‘हा’ खेळाडू आता खेळणार ‘या’ संघाकडून