आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा सातवा हंगाम यूएई आणि ओमानमध्ये सुरू आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेचा इतिहास पाहिला तर दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही जेतेपद मिळवता आले नाहीये. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणारा संघ इतिहास घडवणार आहे. या अंतिम सामन्यापूर्वी एक नजर टाकूया या स्पर्धेच्या ६ हंगामातील अंतिम सामन्यांवर.
आयसीसी टी-२० विश्वचषक २००७, भारत विरुद्ध पाकिस्तान
भारतीय संघाने स्पर्धेच्या पहिल्या हंगामात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला पराभूत करत जेतेपद मिळवले होते. भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५७ धावा केल्या होत्या. या डावात भारतीय संघाकडून गौतम गंभीरने सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाकडून फलंदाजांना साजेशी फलंदाजी करता आली नाही. परंतु मिस्बाह उल हकने सामना शेवटपर्यंत खेचला होता. शेवटी ४ चेंडूंवर ६ धावांची आवश्यकता असताना मिस्बाह उल हकने नको असलेला शॉट खेळला आणि भारतीय संघाने हा सामना जिंकून स्पर्धेचे पहिले वहिले जेतेपद मिळवले.
आयसीसी टी-२० विश्वचषक २००९, पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
पाकिस्तान संघाने २००९ मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाला पराभूत करत जेतेपद मिळवले होते. श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर १३८ धावा केल्या होत्या. श्रीलंका संघाकडून कुमार संगकाराने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून शाहिद आफ्रिदीने ४० चेंडूंमध्ये नाबाद ५४ धावांची खेळी केली आणि पाकिस्तान संघाला जेतेपद मिळवून दिले होते.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०१०, इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
ब्रिजटाऊनमध्ये पार पडलेल्या टी२० विश्वचषक २०१० अंतिम सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला २० षटक अखेर १४७ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला चांगली सुरुवात करता आली नव्हती. परंतु त्यानंतर केविन पीटरसन आणि क्रेग किस्वेटर यांनी १११ धावांची भागीदारी केली होती. अशाप्रकारे त्यांनी इंग्लंड संघाला पहिले वहिले जेतेपद मिळवून दिले होते.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०१२,वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका
श्रीलंकेच्या प्रेमदासा स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या टी२० विश्वचषक २०२१ च्या अंतिम सामन्यात श्रीलंका आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या वेस्ट इंडिज संघाला अवघ्या १३७ धावा करण्यात यश आले होते. या आव्हानाचा बचाव करण्यासाठी धावा कमी असल्या तरी देखील वेस्ट इंडिज संघाने हार मानली नव्हती. सुनील नरेनने ३ गडी बाद करत श्रीलंका संघाला अडचणीत टाकले होते. श्रीलंका संघाचा संपूर्ण डाव १०१ धावांवर आटोपला होता आणि वेस्ट इंडिज संघाने आपले पहिले जेतेपद पटकावले होते.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०१४, भारत विरुद्ध श्रीलंका
श्रीलंका संघाने अप्रतिम कामगिरी करत सलग दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यात श्रीलंका आणि भारतीय संघ आमने सामने होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाला अवघ्या १३० धावा करण्यात यश आले होते. ज्यामध्ये विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कुमार संगकाराने या सामन्यात ५२ धावांची खेळी करत श्रीलंका संघाला जेतेपद मिळवून दिले होते.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०१६, वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड
आयसीसी टी-२० विश्वचषक २०१६ स्पर्धेतील अंतिम सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर पार पडला होता. या सामन्यात वेस्ट इंडिज आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने होते. इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना १५५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी केली होती. शेवटच्या षटकात वेस्ट इंडिज संघाला विजयासाठी १९ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी क्रेग ब्रेथवेटने सलग चार षटकार मारून वेस्ट इंडिज संघाला विजय मिळवून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता! राहुल द्रविडच्या जागी ‘या’ ठिकाणी झाली व्हीव्हीएस लक्ष्मणची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड
टी२० विश्वचषकात ‘असा’ राहिलाय ऑस्ट्रेलिया संघाचा प्रवास, एक वेळा तोंडून हिरावलाय जेतेपदाचा घास