एप्रिलच्या रणरणत्या उन्हात आयपीएल चांगलीच रंगलीय. पारा ४० अंशाच्या खाली यायचं नाव घेईना आणि खेळाडू, पण जिंकायचच म्हणून जिवाचा आटापिटा करतायेत. याच आयपीएलच्या भूतकाळातील काही घटना अशा आहेत, ज्यांचा उल्लेख झाल्यावर आपोआप त्या खेळाडू अथवा संघाविषयी रिस्पेक्ट गगनाला जाऊन भिडतो. असाच एक रिस्पेक्टफुल खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा द ग्रेट शेन वॉटसन. आयपीएलच्या इतिहासातील ऑल टाईम ग्रेट ऑलराऊंडर वॉटसन त्याच्या एका इनिंगसाठी नेहमीच लक्षात राहील, ति इनिंग म्हणजे २०१९ आयपीएल फायनलची इनिंग.
दोन वर्ष बॅन झाल्यावर चेन्नई सुपर किंग्सने २०१८ ला जबरदस्त कमबॅक केला. त्यांनी सनरायझर्सला फायनलला पाणी पाजत आपली तिसरी ट्रॉफी जिंकली. पुढच्या वर्षी सीएसके आणि धोनी मॅजिक पुन्हा चालली. टीम सलग दुसऱ्यांदा फायनलला. चौथी ट्रॉफी जिंकायचा त्यांनी निर्धारच केलेला. यावेळी फायनलला तगडे आव्हान होते कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सचे.
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकला आणि पहिली बॅटिंग करायचं ठरवलं. डी कॉकनं चार छक्के मारत मुंबईला ग्रॅंड ओपनिंग दिली, पण पुढचा गणित फसलं. सारेच पंधरा-वीस रन्स करून माघारी जायला लागले. एकटा पोलार्ड तात्या शेवटपर्यंत उभा राहिला आणि चाळीस रन करत टीमला १४९ पर्यंत घेऊन गेला.
हेही पाहा- आपल्या संघासाठी जीवावर उदार होत लढणारा शेन वॉटसन
चौथी ट्रॉफी जिंकायला सीएसकेला १५० रनांची गरज होती. प्लेसिसने झोकात स्टार्ट केला, पण जी गत मुंबईची झाली झाली तीच चेन्नईची. मात्र, पीचवर कोण कॉन्फिडन्सनं उभंच राहिना. अपवाद शेन वॉटसनचा. वर्षभरापूर्वी फायनलला नाबाद सेंचुरी मारत त्याने सीएसकेला चॅम्पियन बनवलेलं. यावर्षी देखील ते शिवधनुष्य त्यानेच पेलायचं ठरवलं. तो एकटाच मुंबईच्या बॉलर्सचा घाम काढत राहिला. लास्ट ओवरला सीएसकेला जिंकायला हव्या होत्या ९ रन्स. पहिल्या तीन बॉलवर चार रन आले. आणि चौथ्या बॉलला घात झाला. दुसऱ्या रनसाठी पळताना वॉटसन रनआऊट झाला. स्टेडियममध्ये स्मशान शांतता पसरली. ५९ बॉलमध्ये ८० रन्सची इनिंग खेळून वॉटसन माघारी जात होता. शार्दुल ठाकूर दोन बॉलमध्ये चार रन काढायला फेल झाला आणि मुंबई चॅम्पियन बनली. वॉटसनची झुंजार इनिंग वाया गेली.
सगळीकडे मुंबईच्या विजयाची चर्चा सुरू असतानाच, सीएसकेच्या हरभजन सिंगने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली. ज्यात लिहिले वॉटसनच्या पायाला ६ टाके घातले गेलेत, आणि तो काल असाच जखमी होऊन खेळत होता. अवघ्या काही वेळात वॉटसन ट्रेंडींगमध्ये आला. त्याचे फोटो व्हायरल व्हायला लागले. इनिंगच्या तिसऱ्याच ओवरमध्ये त्याच्या डाव्या गुडघ्याला लागलेलं आणि तो तसाच खेळत राहिलेला. शेवटपर्यंत त्याचा पाय सारा रक्तबंबाळ झाला. पिवळी पॅन्ट लाल झाली, पण ट्रॉफी जिंकायचीच या उद्देशाने तो शेवटपर्यंत मागे हटला नाही.
वॉटसनच्या या समर्पणाने साऱ्यांना अनिल कुंबळेची आठवण झाली. २००२ वेस्टइंडीज टूरवर जबडा तुटलेला असतानाही अनिल कुंबळे दुर्दम्य इच्छाशक्ती आणि समर्पण दाखवत पुन्हा मैदानात उतरलेला. अगदी तशीच स्टोरी वॉटसनची झाली. नंतर एका मुलाखतीत वॉटसन म्हणाला, “संघासाठी दुखापत आणि टाके काहीच नाहीत.”
पुढे वॉटसन आयपीएलचा आणखी एक सिझन खेळून रिटायर झाला. आयपीएलचा इतिहासातील पहिला प्लेयर ऑफ द टुर्नामेँट असलेला वॉटसन आता दिल्ली कॅपिटल्सचा कोच बनलाय. खरंतर ही त्याची सेकंड इनिंग ठरतेय. आयपीएलमध्ये वॉटसनने बॅट आणि बॉलने अनेक मॅचविनिंग परफॉर्मन्स दिले, पण त्याचा गुडघा फूटून पिवळी पॅन्ट रक्ताने लालभडक झालेला फोटो म्हणजे निव्वळ आयकॉनिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सला IPL 2022मध्ये मिळालाय ‘हिरा’, तो ‘बेबी एबी’ नाव सार्थ करणारंच!
रेल्वेत ‘गँगमन’ ते आयपीएल टीम्सचा ‘लकी चार्म’, वाचा एका दिवसात करोडपती बनलेल्या कर्णबद्दल
इंग्लंडने ३ रनांनी मॅच मारली, आणि ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ ऐतिहासिक पराभवामुळे हसी क्रिकेटर झाला