टी20 विश्वचषक 2024 मध्ये इंग्लंड आणि नामिबिया यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान विश्वचषकात यापूर्वी कधीही न घडलेली घटना घडली. या सामन्यात नामिबियाचा सलामीचा फलंदाज निकोलस डेव्हिन ‘रिटायर्ड आऊट’ झाला. यासह त्याच्या नावावर अनोखा विक्रम नोंदवला गेला. निकोलस डेव्हिन हा विश्वचषकात ‘रिटायर्ड आऊट’ होणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
पावसानं व्यत्यय आणलेल्या या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 10 षटकांत 5 गडी गमावून 122 धावा केल्या. 123 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाला मायकेल व्हॅन लिंगेन आणि निकोलस डेव्हिन या जोडीनं चांगली सुरुवात करून दिली. मात्र निकोलस डेव्हलिनला वेगानं धावा करता आल्या नाही. यामुळे त्यानं ‘रिटायर्ड आऊट’ होण्याचा निर्णय घेतला. तो 16 चेंडूत 18 धावा करून मैदानाच्या बाहेर गेला. यासह, कोणत्याही विश्वचषकात निवृत्त होणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, खेळाडूंना ‘रिटायर्ड हर्ट’ होताना अनेकवेळा ऐकलं आणि पाहिलं असेल, पण हे ‘रिटायर्ड आऊट’ म्हणजे काय? चला तर मग, आज आम्ही तुम्हाला हे दोन्ही नियम काय आहेत आणि त्यांच्यातील फरक काय? याबद्दल सांगतो.
‘रिटायर्ड हर्ट’ म्हणजे कोणताही फलंदाज दुखापत झाल्यानंतर मैदानाबाहेर जातो. फलंदाजी करताना खेळाडूला दुखापत झाल्यास तो मैदानाबाहेर जाऊ शकतो. अशा स्थितीत त्याला ‘रिटायर्ड हर्ट’ म्हटलं जातं. ‘रिटायर्ड हर्ट’ झालेला फलंदाज त्याच्या संघाच्या डावात कधीही फलंदाजीला येऊ शकतो.
‘रिटायर्ड आऊट’ हा नियम पूर्णपणे वेगळा आहे. यामध्ये जेव्हा एखादा फलंदाज स्वतःहून किंवा कर्णधाराच्या इच्छेनुसार मैदानाबाहेर जातो, तेव्हा त्याला ‘रिटायर्ड आऊट’ म्हटलं जातं. जर एखाद्या फलंदाजाला कोणतीही दुखापत झाली नसेल आणि तरीही तो स्वत:च्या इच्छेनं मैदानाबाहेर गेला तर तो ‘रिटायर्ड आऊट’ समजला जातो. ‘रिटायर्ड आऊट’ झालेला फलंदाज पुन्हा फलंदाजीला येऊ शकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकाच्या इतिहासात असं प्रथमच घडलं, नामिबियाच्या कर्णधाराचं नावं रेकॉर्ड बुकमध्ये नोंदल्या गेलं
ठरलं! गौतम गंभीरच असणार भारतीय संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक, या दिवशी होणार घोषणा
फलंदाजीसह दोन्ही हातांनी करतो गोलंदाजी! या अनोख्या खेळाडूची बीसीसीआयनं घेतली दखल