ब्रेबॉर्न स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल २०२२मधील शेवटची लीग मॅच पार पडली. विजयाने सीझनचा ‘हॅपी एंडिंग’ करण्याचा त्यांचा मानस होता, पण त्यांना तिथेही अपयश आले. खरंतर त्यांच्यासाठी हा सीजनच असा राहिला. डीफेंडिंग चॅम्पियन म्हणून आपल्या खिताबाचा बचाव करायला उतरलेल्या चेन्नईची गाडी पूर्ण सीझनमध्ये रुळावर आलीच नाही. ज्या सीएसकेच्या ‘टीम ऍटमॉस्पीअर’चे दाखले जगभरात दिले जायचे, सगळी गोष्ट तिथेच बिनसली होती.
सीएसकेने सिझनआधी रिटेन्शन करताना मोठे निर्णय घेतले. फर्स्ट रिटेन्शन म्हणून कॅप्टन धोनीऐवजी जडेजाला पसंती दिली. हा धोनीच निर्णय असल्याचे म्हटले जात होते. सोबत धोनी, मागच्या सीझनचा ऑरेंज कॅप होल्डर ऋतुराज गायकवाड आणि इंग्लिश ऑलराऊंडर मोईन अली यांना पसंती दिली गेली. ऑक्शनमध्येही उथप्पा, रायुडू, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, सॅंटनर यांना उचलत गेल्या सिझनचा संघच बऱ्यापैकी कायम केला. डेवॉन कॉनवे, महिश तिक्षणा आणि प्रिटोरियसच्या रूपाने इंटरनॅशनल क्रिकेटमधील नवी परंतु, परिपक्व वाटणारी नावे यलो आर्मीत आली.
या सगळ्यात मोठा निर्णय आयपीएल सुरू होण्याच्या दोन दिवस आधी घेतला गेला. धोनीने कॅप्टन्सी सोडली आणि बॅटन जडेजाकडे दिला. जडेजाला ही जबाबदारी एवरेस्टसारखी वाटली. कॅप्टन्सी राहू द्या त्याचा स्वतःचा परफॉर्मन्स धड झाला नाही. आठपैकी सीएसके फक्त दोन मॅच जिंकली. मग मात्र जडेजाला राहवलं नाही आणि त्याने पुन्हा धोनीला कॅप्टन होण्यास सांगितले. धोनी कॅप्टन होताच सीएसके तीन मॅच जिंकल्या, पण पुन्हा सलग हार. दरम्यान जडेजा आणि टीम मॅनेजमेंटच बिनसलं. इंस्टाग्रामवर फॉलो अनफॉलोचा खेळ झाला. मात्र, सीएसकेकडून सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं गेलं, पण निकाल बदलणार नव्हता. सीएसकेला आयपीएल हिस्ट्रीमध्ये केवळ दुसऱ्यांदा अपयश आलेलं. ते प्लेऑफ खेळणार नव्हते.
सन २०२२ मध्ये जे घडलं ते पुढच्या वर्षी विसरून येण्याचा चेन्नई प्रयत्न करेल. जसं २०२१ मध्ये केलं होतं. २०२० ला सुद्धा ते पुढे जाऊ शकले नव्हते. मात्र, कमबॅक काय असतो हे त्यांनी २०२१ ला दाखवून दिले आणि ते चॅम्पियन बनले. २०२३ ला तोच इतिहास कायम करण्यासाठी चेन्नई काय करू शकते? हे थोडक्यात जाणून घेऊया.
चेन्नईचा कॅप्टन असलेल्या धोनीने लास्ट मॅचवेळी स्पष्ट सांगितले की, मी पुढच्या वर्षी खेळतोय. म्हणजे चेन्नईला कॅप्टन बदलावा लागणार नाही आणि रणनीती एकदम तयार असेल हे आपण मान्य करूनच चालू. आता संघात काही बदल होतील का? या प्रश्नात खरंतर चेन्नईच भविष्य दडलेलं आहे. चेन्नईचा आजवरचा अनुभव आणि त्यांनी घेतलेले निर्णय पाहता संघात, एखाद दुसराच बदल होऊ शकतो.
डेवॉन कॉनवेने सीएसकेच्या सक्सेसफुल ओवरसीज ओपनरची परंपरा कायम राखलीये. हेडन, हसी, प्लेसिसनंतर ही जागा आपण अनेक वर्ष चालवू असा विश्वास दिलाय. दुसऱ्या बाजूला ऋतुराज गायकवाड आहेच. मिडल ऑर्डरमध्ये सीएसकेचा खरा कस लागेल. मोईन अली संघात फिट आहे, पण बाकीच्यांचं टेन्शन येतं. शिवम दुबेचा विश्वास वाटत नाही आणि रायडूला अधूनमधून रिटायरमेंटचे झटके येत असतात. वन लास्ट टाईम म्हणत धोनी फिनिशर बनेल. संघासाठी सर्वात मोठा पॉझिटिव असेल दीपक चहरच परत येणं. १४ कोटींची बोली लावलेला चाहर यावर्षी एकही मॅच खेळू शकला नाही. या सीझनला चमकलेल्या काही नवीन बॉलर्सने सीएसके मॅनेजमेंटचा जीवन नक्कीच भांड्यात टाकला असेल.
पुढच्या वर्षी चेन्नईला आपल्यास ७ मॅचेस होम ग्राऊंडवर म्हणजे चेन्नईच्या चेपॉकवर खेळायला मिळतील, आणि सध्याची चेन्नईची टीम तिथे खेळण्यासाठी एकदम परफेक्ट वाटते. जडेजा, मोईन, तिक्षणा आणि सोलंकी हे स्पिनर तिथे कहर करणारच. साथीला दिपक चाहर आणि मुकेश चौधरी यांचा स्विंगही असेल. पथिराना, ब्राव्होही फायदे का सौदा नक्कीच ठरतील. एकूणच पुढच्या वर्षी चेन्नई स्ट्रॉंग कमबॅक करेल याची चिन्हे मिळत आहेत, आणि असं घडलं तर सीएसकेला पाचवी ट्रॉफी उचलताना पाहिल्यास आश्चर्य वाटायला नको.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एवढं कौतुक झालेल्या राजवर्धनला चेन्नईने बसूनच ठेवलं, का नाही मिळाली संधी?
युझीचा ‘किल्लर’ लूक, टीम इंडियात पुनरागमन करण्याआधी चहलने केली नवी हेयरस्टाईल
टी-२० मालिका INDvsSA संघाची, पण टीम इंडियाकडे पाकिस्तानचा जबर विक्रम मोडण्याची संधी