आयपीएल २०२१ चा एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित २० षटकात १३८ धावा केल्या. केकेआरने सांघिक खेळ दाखवत चार गडी राखून सामना जिंकला
आरसीबीने दिलेल्या १३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरला आरसीबीच्या वेगवान गोलंदाजांसमोर चांगली सुरुवात करणे आवश्यक होते. अशा स्थितीत व्यंकटेश अय्यरसह शुबमन गिलने चांगली भागीदारी रचली आणि आपल्या संघाला दडपणापासून दूर केले. अखेर, जेव्हा केकेआरने आरसीबी संघाचा पराभव केला, तेव्हा संपूर्ण संघासह शुबमन खूप आनंदी दिसत होता.
संघासाठी हा मोठा विजय असल्याचे त्याने सांगितले. तसेच तो म्हणाला, जेव्हा आम्ही आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात येत होतो, तेव्हा बरेच लोक असे होते ज्यांना शंका होती की आम्ही प्लेऑफमध्ये पात्र ठरु की नाही. पण संघातील प्रत्येकाने ज्या प्रकारे खेळ दाखवला, ते खूप उत्तम आहे आणि आम्हाला आशा आहे की आम्ही आमचा चांगला फॉर्म असाच सुरू ठेवू.
शुबमन गिल म्हणाला, माझ्यासाठी भारतामधील पहिला टप्पा चांगला नव्हता, पण मला माहित होते की मी चांगली फलंदाजी करत आहे, मला फक्त खेळपट्टीवर टिकून राहण्याची गरज होती. आता केकेआरचा सामना क्वालिफायर २ सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, तो १५ ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध अंतिम सामना खेळेल.
दिल्लीविरुद्धच्या क्वालिफायर सामन्याबाबत शुबमन गिल म्हणाला की, दिल्ली खुप एक संतुलित संघ आहे. आम्ही आशा करतो की आम्ही सामन्यात चांगला खेळ दाखवू. आमचा सलग तिसरा सामना हा शारजाहच्या मैदानावर होत आहे. या खेळपट्टीवर कसे खेळावे हे आम्हाला चांगले माहित झाले आहे. मला वाटते की सध्या प्रत्येकाला खेळपट्टी आणि परिस्थिती चांगली माहित आहे.
शुबमन म्हणाला की, मला वाटते की दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आम्ही आमचा चांगला खेळ दाखवू. दिल्लीविरुद्धच्या गेल्या सामन्यात पहिला पॉवरप्ले पूर्णपणे आमच्या विरोधात होता, पण आम्ही मधल्या षटकांमध्ये ज्याप्रकारे गोलंदाजी केली ती जबरदस्त होती. त्या महत्त्वाच्या विकेट मिळवणे आणि त्यांच्यावर दबाव टाकणे, हे खूप प्रभावी होते. आता आम्ही पुढच्या सामन्यात देखील असेच प्रयत्न करणार आहोत.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील क्वालिफायर २ चा सामना शारजाहमध्ये १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल खेळणे उपयुक्त ठरले; टी२० विश्वचषकात फायदा होईल, पंजाब किंग्सच्या क्रिकेटरचा विश्वास
‘तो स्वत:ला एक अपयशी कर्णधार समजेल’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने विराटच्या जखमेवर चोळले मीठ
शेफाली वर्माने गमावले टी२० क्रमवारीतील अव्वल स्थान, ऑसी फलंदाजाने टाकले मागे





