भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पालकत्व रजा आजकाल चर्चेचा विषय बनली आहे. विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा जानेवारी २०२१ मध्ये आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यास सज्ज आहेत. आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी विराट पत्नी आणि कुटुंबासह राहू इच्छितो. अशा परिस्थितीत त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून पालकत्व रजा मिळवली आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यावर ऍडलेड येथील पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर तो भारतात परत येईल. विराट कोहलीच्या पालकत्व रजेविषयी क्रिकेट चाहते आणि माजी खेळाडूंच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
परंतु असे बरेच क्रिकेटपटू आहेत जे आपल्या मुलांच्या जन्मावेळी कुटुंबासह राहू शकले नव्हते. अशा खेळाडूंची बरीच लांबलचक यादी आहे. यातील एक नाव भारताचे सर्वकालीन दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांचे आहे.
कपिल देव यांनी केला होता खुलासा
अलीकडेच कपिल देव यांनी सांगितले होते की, सुनील गावसकर तीन महिने आपल्या मुलाला पाहू शकले नव्हते.
गावसकर जेव्हा त्यांचा मुलगा जन्मला, तेव्हा वेस्ट इंडिजच्या दौर्यावर होते. १९७६ मध्ये रोहन गावसकर याचा जन्म झाला, तेव्हा भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मालिका खेळली जात होती. कपिल देव यांच्यानंतर आता, भारताचे माजी सलामीवीर अंशुमन गायकवाड यांनी आपल्या मुलाला भेटू न शकल्यामुळे गावसकर कसे अस्वस्थ झाले होते, याविषयी खुलासा केला आहे.
बीसीसीआयने नव्हती दिली गावसकरांना परवानगी
प्रदीर्घ काळ सुनील गावसकर यांचे सलामीचे साथीदार राहिलेल्या गायकवाड यांनी सांगितले की, “गावसकर आपल्या मुलाला पाहण्यासाठी भारतात येण्यास इच्छुक होते. कारण भारताची पुढील मालिका दोन आठवड्यांनंतर वेस्ट इंडिजमध्ये होती. परंतु बीसीसीआयने त्यांना परवानगी दिली नाही. बीसीसीआयने गावसकर यांना उर्वरित संघासह वेस्ट इंडिजला जाण्यास सांगितले होते. त्यानंतर गावसकर जवळपास तीन महिन्यानंतर आपल्या मुलाला पाहू शकले.”
वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांमुळे भारतीय फलंदाज झाले होते जायबंदी
गायकवाड यांनी ‘डेली गार्डियन’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “गावसकर आपल्या मुलाला पाहू शकत नसल्याने कमालीचे भावनिक झाले होते. भरीस भर म्हणून, वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना त्रस्त केले होते. भारताच्या पाच फलंदाजांना बाउंसर आणि बीमरच्या माऱ्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागलेले. गावसकर यांनी पंचांकडे बीमरविरोधात तक्रार केली म्हणून त्यांची खिल्लीदेखील उडवली गेली होती.”
… मला माझ्या मुलाला पाहायचे आहे
अंशुमन गायकवाड यांनी सुनील गावसकर यांचा त्या मालिकेतील किस्सा सांगताना म्हटले की, “वेस्ट इंडिजच्या घातक गोलंदाजांनी आम्हाला बाउंसर आणि बीमरच्या माऱ्याने हैराण केले होते. त्यावेळी गावसकर मला म्हणाले, ‘अंशुमन, मला माझ्या मुलाला पाहायचे आहे. मी इथे मरण्यासाठी आलेलो नाही.’ त्यावेळी गावसकर खूपच रागावले होते. त्यापूर्वी मी त्यांना कधी तितके रागावलेले पाहिले नव्हते.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘गावसकरांनी आपल्या मुलाला तीन महिने पाहिले नव्हते,’ विराटच्या पालकत्व रजेवर दिग्गजाची प्रतिक्रिया
आजारी असलेल्या ‘या’ दिग्गज हॉकीपटूला सुनील गावसकर यांचा मदतीचा हात
…आणि रोहितने दोन मिनिटात केली सुनील गावसकरांची बोलती बंद