भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विन सध्या त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे सातत्याने चर्चेत येत आहे. त्याने गेल्या काही कसोटी सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. त्याने नुकत्याच इंग्लंड विरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेत ३२ विकेट्स घेतल्या होत्या. तसेत एक शतकही केले होते. त्यामुळे त्याला भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघातही पुन्हा संधी मिळणार का, असे प्रश्न विचारले जात आहेत.
अश्विन २०१७ मध्ये शेवटचे मर्यादीत षटकांच्या भारतीय संघाकडून खेळला आहे. त्यानंतर त्याला भारताच्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघात संधी देण्यात आलेली नाही. पण सध्याचा अश्विनचा फॉर्म पाहाता त्याचे भारतीय टी२० संघामध्ये पुनरागमन होणार का असा प्रश्न १२ मार्चपासून इंग्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या टी२० मालिकेआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीला विचारण्यात आला.
या प्रश्नावर विराट चांगलाच भडकला होता. त्याने वॉशिंग्टन सुंदर जोपर्यंत खराब कामगिरी करत नाही तोपर्यंत भारत दुसऱ्या पर्यांयाचा विचार करणार नसल्याचे स्पष्ट केले.
तो म्हणाला, ‘वॉशिंग्टनने आमच्यासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे तुम्ही एकाच प्रकारचे खेळाडू एकाच स्थानासाठी खेळवू शकत नाही. जोपर्यंत वॉशिंग्टन खराब कामगिरी करत नाही, तोपर्यंत दुसरा विचार केला जाणार नाही.’
तसेच तो म्हणाला, ‘मला वाटतं ज्या प्रश्नांना काही तर्क आहेत, असे प्रश्न विचारायला हवेत. तुम्ही मला सांगा मी अश्विनला कुठे जागा देऊ? त्याला कुठे खेळवू? वॉशिंग्टन ती भूमीका योग्य प्रकारे निभावत आहे. प्रश्न विचारणे सोपे आहे, पण पहिल्यांदा तुम्हाला त्यामागील तार्किक स्पष्टीकरण देता यायला हवे.’
वॉशिंग्टनची आंतरराष्ट्रीय टी२० मधील कामगिरी –
वॉशिंग्टनने २०१७ साली आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत २६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून यामध्ये त्याने २९.१४ च्या सरासरीने २१ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याचा इकोनॉमी रेट ७ पेक्षाही कमी आहे.
आर अश्विनची आंतरराष्ट्रीय टी२० मधील कामगिरी –
अश्विनने भारताकडून ४६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून यामध्ये त्याने २२.९४ च्या सरासरीने ५२ विकेट्स घेतल्या आहेत. तो भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ५० विकेट्सचा टप्पा पार करणारा पहिला गोलंदाजही आहे. त्याच्यानंतर जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहलने हा पराक्रम केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
शिखर धवनचा पत्ता होणार कट? पहिल्या टी२० साठी ‘या’ सलामीवीरांना मिळणार संधी, विराटचा खुलासा
शिखर धवन की केएल राहुल, कोणाबरोबर करणार सलामीला फलंदाजी? रोहित शर्माने दिले ‘हे’ उत्तर