जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक टी२० क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२२) (IPL 2022) पंधरावा हंगाम या वर्षी एप्रिल महिन्यात सुरू होईल. या हंगामापूर्वी स्पर्धेतील दहा संघ खेळाडूंची निवड करतील. त्यासाठी १२ व १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोर येथे आयपीएलचा मेगा लिलाव (IPL Mega Auction) पार पडेल. या लिलावात सर्व संघ कोट्यवधींची बोली लावत खेळाडूंना आपल्या संघात सामील करतील. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून अशीच पद्धत अवलंबली जात आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात ऑक्शनर म्हणून रिचर्ड मेडली (Richard Madley) यांनी ही भूमिका निभावली होती. त्या लिलावा वेळच्या काही घटनांचा खुलासा मेडली यांनी नुकताच केला.
अश्विनशी साधला संवाद
जगप्रसिद्ध ऑक्शनर असलेल्या मेडली यांनी नुकताच भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याच्यासोबत यूट्यूबच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी एमएस धोनीच्या लिलावाचा किस्सा सांगताना मेडली म्हणाले, “धोनीचा लिलाव अत्यंत रोमांचक होता. कारण, त्याच्यावर सर्व संघांनी बोली लावली होती.”
धोनी आयपीएलच्या पहिल्या हंगामात सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्यावेळी त्याला जवळपास ६ कोटी रुपयांमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने आपल्या ताब्यात सामील केले होते.
शाहरुखबाबत सांगितली आठवण
मेडली यांनी या मुलाखतीत प्रसिद्ध अभिनेता व कोलकाता नाईट रायडर्स संघाचा संघमालक शाहरुख खान याच्याबाबतही एक आठवण सांगितली. ते म्हणाले, “लिलावानंतर एका पत्रकाराने विचारते, शाहरुख खानसोबत एकाच रूममध्ये असताना तुम्हाला कसे वाटले? त्यावर मी म्हणालो कोण शाहरुख खान? कारण, मला त्यावेळी खरेच माहित नव्हते तो कोण आहे. नंतर मला समजले की त्या रूममध्ये भारतातील सर्व प्रसिद्ध उद्योगपती व सेलिब्रिटी उपस्थित आहेत. एक ऑक्शनर म्हणून तुम्हाला नेहमीच तटस्थ राहावे लागते.”
मेडली यांनी २०१८ ते २०१७ पर्यंत आयपीएल ऑक्शनर म्हणून काम पाहिले. त्यानंतर ह्युज एडमिड्स हे ती जबाबदारी पार पाडत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
युवा विश्वचषकात चमकदार कामगिरीनंतरही भारताचा ‘हा’ खेळाडू नाही आयपीएल लिलावाचा भाग, वाचा कारण
गांगुलीच्या इच्छेला हार्दिककडून बगल? रणजी स्पर्धेबाबत घेतला मोठा निर्णय