असं म्हटलं जात की, जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त स्त्रिया एकत्र येतात, तेव्हा कोणत्या-ना-कोणत्या विषयावर चर्चा रंगतेच. अगदी मलाही असंच वाटतं, पण केवळ स्त्रियाच नव्हे, तर पुरुष मंडळीही जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांचीही जोरदार चर्चा रंगते. मग ती व्यक्ती तुमच्या-आमच्यासारखी साधारण असो वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावरील महान क्रिकेटपटूंपैकी एक असो.
असेच एकदा ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन (Sir Don Bradman) आणि भारताचे लिस्टर मास्टर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्यात गप्पा रंगल्या होत्या. त्यांच्या या चर्चेत क्रिकेटशी संबंधित गोष्टींचा उल्लेख होणे साहजिक होतेच, पण ऑस्ट्रेलियाचे दमदार कसोटीपटू ब्रॅडमन हे चक्क भारतातील एका राजकारणी पक्षासंबंधित माहिती जाणून घेण्यात व्यस्त होते. त्याच ब्रॅडमन यांची रविवारी (दि. 27 ऑगस्ट) 115वी जयंती आहे. त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1908 साली झाला होता.
ब्रॅडमन यांच्या 115व्या जयंती निमित्ताने त्यांच्या जिवनातील एक रोमांचक किस्सा जाणून घेऊया…
झाले होते असे की, 1977-78 साली भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. दरम्यान दक्षिण आफ्रिका क्रिकेट असोसिएशनने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंसह पाहुण्या भारतीय क्रिकेटपटूंना एका डिनर पार्टीसाठी आयोजित केले होते. यावेळी सर्वांसाठी योग्य बैठकव्यवस्था करण्यात आली होती.
ठरलेल्या वेळेनुसार भारतीय आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पार्टीला पोहोचले. सर्वजण आपापल्या ठिकाणी आसनस्थ झाले. इतरांप्रमाणे नुकतेच भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधार बनलेले क्रिकेटपटू गावसकर यांनीही त्यांची जागा पाहिली आणि विराजमान झाले, पण त्यांच्या बाजूची खुर्ची अजूनही रिकामी होती. हे पाहून, ही नक्की कुणाची जागा असेल?, याचा शोध घेण्यासाठी गावसकर इतके तिकडे पाहत होते. तेवढ्यात साक्षात सर ब्रॅडमन समोरुन चालत आले आणि गावसकरांच्या बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसले.
बापरे! साक्षात ब्रॅडमन आपल्या बाजूला येऊन बसले! अशा परिस्थितीत माझी तर बोलतीच बंद झाली असती. पण हा कोणता साधारण क्रिकेटपटू नव्हता, जो जगातील महान क्रिकेटपटूला घाबरेल. ते सुनील गावसकर होते. तेच गावसकर, ज्यांनी त्यांच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा खतरनाक गोलंदाजांच्या गोलंदाजीवर जोरदार धावा कुटल्या होत्या आणि लोकांच्या मनावर आपले नाव कोरले होते.
तसे तर, ब्रॅडमन जेव्हा गावसकरांच्या बाजूला येऊन बसले, तेव्हा गावसकर जास्त काही बोलले नाहीत. ते शांत बसून राहिले आणि ब्रॅडमन यांच्या सर्व गोष्टी कान देऊन ऐकल्या. 1947-48सालचा भारतीय क्रिकेट संघ, विजय मर्चंट आणि रुसी मोदी यांच्या गोष्टी, अशा बऱ्याच विषयांवर ब्रॅडमन बोलत होते. दरम्यान त्यांनी एक असाही किस्सा सांगितला ज्याचा त्यांना खूप पश्चाताप होत होता.
ब्रॅडमन गावसकरांना म्हणाले की, “आम्ही 1948सालच्या दौऱ्यासाठी इंग्लंडला चाललो होतो, आमचे जहाज मुंबईच्या किनाऱ्यावर उभे होते. त्यावेळी हजारो लोक फक्त एकदा मला पाहण्यासाठी तिथे आले होते. पण मी साधे डेकपर्यंत जाऊन त्यांना अभिवादनदेखील करु शकलो नाही. मला याच गोष्टीचा खूप पश्चाताप होतो. तेव्हा विजय मर्चंटने मला सांगून ठेवले होते की, मला भेटण्यासाठी तिथे खूप लोक येतील. तर मी डेकवर जाऊन फक्त चाहत्यांकडे बघून हवेत हात हालवला, तरी ते आनंदी होतील. पण, विजयच्या त्या साध्या विनंतीला मी पूर्ण करु शकलो नव्हतो.”
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे जहाज बराच वेळ मुंबईच्या किनाऱ्यावर उभे होते. पण, ब्रॅडमन त्यांच्या कॅबिनमधून बाहेर आले नव्हते. कारण, त्यावेळी त्यांची तब्येत खूप खराब होती आणि बाहेर येऊन आपल्याला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होईल, याचा धोका त्यांना पत्करायचा नव्हता. म्हणून ते पूर्ण वेळ त्यांच्या कॅबिनमध्ये बसून होते.
हा तर आपण पुन्हा 1977-78 सालच्या त्या खास भेटीकडे येऊयात.
या दरम्यान ब्रॅडमन यांनी हिंदुत्त्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाविषयीही गावसकरांशी चर्चा केली होती. स्वत: ब्रॅडमन यांनी भारत आणि शिवसेना पक्षाविषयी गावसकरांना काही प्रश्न विचारले होते. या गोष्टीचा नंतर गावसकरांनी खुलासा केला होता.
या पूर्ण चर्चेदरम्यान बिचारे गावसकर आपल्या जागेवरुन हाललेदेखील नव्हते. त्यांना खूपची जोराची बाथरुम आली होती, तरी ते गेले नव्हते. कारण, त्यांना ब्रॅडमन यांच्यासोबतचा एक क्षणही वाया घालवायचा नव्हता. आता तुम्हा सर्वांना वाटत असेल की, गावसकरांनी असे का केले असावे. तर ऐका, भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापुर्वी मुंबईचे प्रसिद्ध प्रशिक्षक वासू परांजपे यांनी गावसकरांना सांगितले होते की, “ब्रॅडमन यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालव आणि त्यांच्या एका-ना-एका गोष्टीचे व्यवस्थित निरीक्षण करुन सर्व माहिती मला आणून दे.”
वासू हे मुंबईच्या निवडक दिग्गज प्रशिक्षकांपैकी एक होते. याबरोबरच ते गावसकरांचे सुरुवातीचे क्रिकेट प्रशिक्षकदेखील होते. त्यांनीच गावसकरांना ‘सनी’ हे टोपणनाव दिले होते. वासू हे ब्रॅडमन यांना आपले दैवत मानत असायचे आणि गावसकरांच्या नजरेत वासू यांचा दर्जाही कोणत्या देवापेक्षा कमी नव्हता.
आता तरी समजलं असेल ना, गावसकरांनी डिनर पार्टीमध्ये ब्रॅडमन यांच्याशी चर्चा करताना तसे का केले होते. एक शिष्य केवळ आपल्या गुरुच्या आज्ञेचे पालन करत होता.
हेही वाचा-
सर डॉन ब्रॅडमन यांच्या फलंदाजीचा 74 वर्षे जुना एकमेव रंगीत व्हिडिओ पाहिलाय का? नसेल, तर लगेच पाहा
जेव्हा ‘विक्रमादित्य ब्रॅडमन’ यांनी अवघ्या 3 षटकात झळकावले होते शतक