सर डॉन ब्रॅडमन म्हणजे क्रिकेट जगतातील सर्वात आदरार्थी नाव. क्रिकेटमधील पहिले विक्रमादित्य म्हणून ब्रॅडमन यांना ओळखले जाते. कसोटी क्रिकेटमधील जवळपास सर्वच विक्रम पहिल्यांदा ब्रॅडमॅन यांच्याच नावे जमा झाले होते. ऑस्ट्रेलियासाठी 1928 ते 1948 यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या ब्रॅडमन यांचे काही विक्रम हे आज सत्तर वर्षांनंतरदेखील अबाधित आहेत. त्यांच्या सर्वोत्तम सरासरीच्या (99.96) विक्रमाच्या जवळपास अजून तरी कोणी गेले नाही. ब्रॅडमन यांचा असाच एक विक्रम आहे, ज्याची नोंद घेतली जाते. हा विक्रम म्हणजे अवघ्या तीन षटकांत शतक झळकावण्याचा. हे शतक पूर्ण करण्यासाठी त्यांना फक्त 22 चेंडू लागले होते. 27 ऑगस्ट हा ब्रॅडमन यांचा जन्मदिवस. यानिमित्ताने त्यांच्या या खास पराक्रमाविषयी जाणून घेऊयात…
प्रदर्शनीय सामन्यासाठी मिळाले होते प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण
सिडनीपासून 60 मैलावर असलेल्या, ब्लॅकहिथ या गावी लिथगो या संघाविरुद्ध एक प्रदर्शनीय सामना खेळला जाणार होता. गावातील मैदानावर नवीन मॅलथोइड प्रकारची खेळपट्टी बनवण्यात आली होती. त्या जिल्ह्यातील अशा प्रकारची ही पहिलीच खेळपट्टी होती. याच खेळपट्टीचा उद्घाटनाचा सामना म्हणून, हा सामना आयोजित केला होता. या उद्घाटनासाठी ब्रॅडमन यांना निमंत्रित करण्यात आले होते. ब्रॅडमन आपले न्यू साउथ वेल्सचे संघसहकारी ऑस्कर वेंडेल बिल यांच्यासह त्या ठिकाणी पोहोचले.
ब्रॅडमन त्यावेळी ऑस्ट्रेलियात चांगलेच प्रसिद्ध झाले होते. दीड वर्षापूर्वी त्यांनी आपल्या आक्रमक फलंदाजीने ऍशेस गाजवली होती. त्यामुळे, प्रेक्षक ब्रॅडमन यांचा खेळ पाहण्यासाठी उत्सुक होते. त्या लहानश्या मैदानावर हजारो प्रेक्षकांनी गर्दी केलेली. या सर्व चाहत्यांना कदाचित माहीत नव्हते की, आज आपण एक चमत्कार पाहणार आहोत.
पहिला चेंडू खेळण्याआधी आले दडपण
ब्लॅकहिथ संघ पहिल्यांदा फलंदाजी करणारा होता. प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात ब्रॅडमन मैदानात दाखल झाले. त्यावेळी एक षटक आठ चेंडूचे होते. ब्रॅडमन यांना वाटले, आपण इतक्या गदारोळात जास्त वेळ टिकणार नाही. पहिल्याच षटकात लिथगो संघाकडून गोलंदाजीसाठी बिल ब्लॅक हे गोलंदाज आले. ब्लॅक यांनी यापूर्वी ब्रॅडमन यांना बाद केले होते. ब्लॅक त्यांना पाहताच ब्रॅडमन लिथगोचे यष्टीरक्षक असलेल्या लिवो वॉल्टर्स यांना म्हटले, “हा मला लवकर बाद करणार. प्रेक्षक नाराज होणार आहेत.”
पहिल्याच षटकात केली दमदार सुरुवात
पहिले षटकातच प्रेक्षकांच्या मनोरंजनाला सुरुवात झाली. ब्रॅडमन यांनी पहिल्या दोन चेंडूंवर दोन उत्तुंग षटकार ठोकले. तिसऱ्या चेंडूवर चौकार त्यांनी वसूल केला. चौथ्या चेंडूवर दोन धावा धावत त्यांनी पूर्ण केल्या. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर पुन्हा सलग दोन चौकार त्यांनी मारले. सातवा चेंडू प्रेक्षकांत भिरकावल्यानंतर, अखेरच्या चेंडूवर एक धाव काढत त्यांनी स्ट्राईक स्वतःकडे राखली. पहिल्याच षटकात ब्रॅडमन यांच्या खात्यात 32 धावा जमा झाल्या होत्या.
दुसऱ्या षटकात चोपल्या 40 धावा
दुसरे षटक घेऊन आलेल्या, होरी बेकर यांची ब्रॅडमन यांनी अत्यंत दयनीय अवस्था केली. त्यांच्या षटकातील सर्व चेंडू सीमारेषेपार गेले. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर, आधी दोन चौकार आणि नंतर दोन षटकार त्यांनी लगावले. चौकार-षटकार-चौकार असे पुढील तीन चेंडू खेळत, त्यांनी षटकातून 40 धावा काढल्या.
…आणि, 22 चेंडूत ठोकले शतक
लिथगोकडून तिसरे षटक टाकण्यासाठी पुन्हा बिल ब्लॅक आले. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू वेंडेल यांनी खेळत एक धाव काढली. ब्रॅडमन यांनी पुन्हा दोन गगनभेदी षटकार मारले. ब्लॅक यांनी चौथा चेंडू यॉर्कर टाकल्याने बेडमन त्यावर एक धाव काढू शकले. वेंडेल यांनी एक धाव काढून, स्ट्राइक ब्रॅडमन यांना दिली. स्ट्राइकवर येतात ब्रॅडमन यांनी दोन चौकार आणि षटकार मारत आपले शतक पूर्ण केले.
तब्बल 256 धावांची तुफानी खेळी
ब्लॅकहिथमध्ये हजर असलेल्या त्या हजार-दोन हजार प्रेक्षकांना अव्वल दर्जाच्या फलंदाजाकडून अव्वल दर्जाची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली होती. ब्रॅडमन यांनी त्या संपूर्ण डावात 14 षटकार आणि 29 चौकारांसह 256 धावांची खेळी केली. वेंडेल यांनीदेखील 66 धावांचे योगदान दिले. ब्लॅकहिथ संघाने त्या सामन्यात 357 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात, लिथगो फक्त 227 पर्यंत पोहोचू शकले.
ब्रॅडमन यांची खेळी क्रिकेट इतिहासातील अजरामर खेळींपैकी एक मानली जाते. हा सामना अधिकृत नसल्याने, ब्रॅडमन यांच्या विस्फोटक शतकाला ‘रेकॉर्डबुक’ मध्ये मात्र जागा मिळाली नाही. (The Story of Don Bradmans Century)
हेही वाचा-
सामना राहिला बाजूला अन् एकमेकांना भिडले पाकिस्तान-अफगाणिस्तानचे चाहते, स्टेडिअममध्येच राडा- व्हिडिओ
वनडे मालिकेत यजमान अफगाणिस्तानला क्लीन स्वीप, पाकिस्तानने जिंकला सलग तिसरा वनडे सामना