आपल्याला असं वाटतं की अंधश्रद्धा ही फक्त अशिक्षित लोकांमध्येच असते. किंवा अंधश्रद्धा ही फक्त आपल्या देशातच दिसते. परंतु असे काही नाही. जगातील कोणतेच क्षेत्र असे नाही, जिथं लोकं अंधश्रद्धा पाळत नाहीत.
आज आम्ही क्रिकेटमध्ये घडलेला असाच एक अंधश्रद्धेचा किस्सा सांगणार आहोत. क्रिकेट क्षेत्रात सुद्धा अंधश्रद्धा निर्माण झाली ती पण कुठे..? वेस्ट इंडिजमध्ये..!!!! आहे ना आश्चर्याची गोष्ट. खर तर वेस्ट इंडिजच्या कर्णधाराला असे वाटले की यामुळेच भारताविरुद्ध सलग ३ कसोटी सामन्यांमध्ये ३ शतके झाली.
वर्ष १९७१ भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौर्यावर होता. गॅरी सोबर्स (Sir Garfield Sobers) वेस्ट इंडीजचे नेतृत्व करत होते, जे नंतर सर गॅरी सोबर्स नावाने ओळखले जाऊ लागले. गॅरी सोबर्स यांनी स्लिपमध्ये २ वेळा सुनील गावसकरांचा झेल सोडला. पहिल्या दोन कसोटी सामन्यात फलंदाजीमध्ये गॅरी सोबर्स यांनी काही खास धावा केल्या नाहीत. त्यांच्यासाठी हा दौरा चांगला राहिला नव्हता.
सुनील गावसकर यांनी आपल्या करिअरची सुरुवात या कसोटी मालिकेतून केली. पहिल्या सामन्यात ते खेळले नाही परंतु दुसर्या सामन्यात भारताच्या विजयात त्यांनी हातभार लावला. दिलीप सरदेसाई यांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा संघातील अवे असलेला खेळाडू गावस्कर यांची खूप प्रशंसा करायचे.
गॅरी सोबर्स एक मैत्रीपूर्ण खेळाडू होते. खेळ सुरू होण्यापूर्वी ते दररोज सकाळी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये यायचे आणि भारतीय खेळाडूंशी चर्चा करायचे. त्यांनी एक प्रथा सुरू केली. जेव्हा जेव्हा ते ड्रेसिंग रूममधून बाहेर पडायचे तेव्हा तेव्हा ते गावस्करांच्या खांद्यावर हात ठेवत. तिसर्या सामन्याच्या शेवटच्या डावात गॅरी सोबर्सनी शतक ठोकले. मालिकेत खराब सुरुवात केलेल्या सोबर्स यांचा खेळ सुधारताना दिसत होता. सोबर्सने चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यात शतकही केले. आतापर्यंत सर्वांना सोबर्सच्या या सवयीबद्दल माहित झाले होते.
शेवटचा दिवस सुरू होणार होता. आदल्या दिवसापासून सुनील गावसकर नाबाद होते. वेस्ट इंडिजची फलंदाजी येणार होती होती. तिसर्या डावात भारत आधीच १६६ धावांनी पिछाडीवर होता. भारतीय कर्णधाराला सर्वात मोठा धोका वाटत होते सोबर्स. त्यांनी यापूर्वीच ३ सामन्यांमध्ये ३ शतके ठोकली होती.
सकाळी सोबर्सने भारतीय ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करताच भारतीय कर्णधाराने सुनील गावसकरांचा हात धरला आणि त्यांना थेट बाथरूममध्ये बंद केले. गॅरी सोबर्स बर्याच वेळेपर्यंत खेळाडूंशी बोलत राहिले आणि तिरकस डोळ्यांनी गावसकरांचा शोध घेत होते.
दिवसाचा खेळ सुरू होण्याची वेळ आली होती. गावसकर यांना सज्ज व्हायचे होते पण ते बाथरूममध्ये बंद होते. जेव्हा गॅरी सोबर्स बाहेर गेले तेव्हाच गावसकरांना बाथरूम मधून बाहेर येऊ दिलं. सोबर्स यांना गावसकर यांचा स्पर्श तर दूरच पण दिसूही दिलं नाही भारतीय कर्णधाराने. अशाप्रकारे भारतीय कर्णधाराने सोबर्सच्या युक्त्यांचा पराभव केला.
सोबर्स फलंदाजीला आले तेव्हा ते पहिल्याच चेंडूवर बाद झाले. आबिद अलीने (Syed Abid Ali) त्यांना त्रिफळाचित केले. सामना अनिर्णित राहिला आणि परदेशी भूमीवर भारताने पहिली कसोटी मालिका जिंकली ती कर्णधार अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात. सुनील गावसकर यांना बाथरूममध्ये बंदिस्त करणारे हेच ते अजित वाडेकर. तेच अजित वाडेकर ज्यांचा १ एप्रिल १९४१ रोजी जन्म झाला होता. आज त्यांची ८१ वी जयंती.
१९७१ च्या वेस्ट इंडीज मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला तिथे तो पुन्हा जिंकला. या मालिकेत भारताच्या कामगिरीने भारतीय चाहत्यांसह संपूर्ण जगाला चकित केले. या दौर्यावर खेळल्या गेलेल्या एकूण १९ प्रथम श्रेणी सामन्यांपैकी भारताने ७ सामने जिंकले आणि अवघ्या १ सामन्यात पराभव पत्करावा लागला.
या दौर्यावर भारताने तीन कसोटी सामन्यांची मालिका १-० ने जिंकली. लॉर्ड्समधील पहिली कसोटी आणि ओल्ड ट्रॅफर्ड येथे दुसरी कसोटी अनिर्णित राहिली. तिसर्या कसोटी सामन्यात भारत पहिल्या डावात ७१ धावांनी मागे होता, परंतु तिसर्या डावात चंद्रशेखरने ३८ धावा देऊन ६ बळी घेतले आणि संपूर्ण इंग्लंड संघ १०१ धावांवर बाद झाला.
जेव्हा आबिद अली विनिंग धावा घेत होता आणि भारत इतिहास घडवत होता, तेव्हा संघाचा कर्णधार खुर्चीत आरामात झोपला होता. हा संघ विजयी होईल याची जाणीव अजित वाडेकर यांना होती आणि ते ड्रेसिंग रूममध्ये आरामात झोपले. संघ विजयी झाला आणि सर्वजण विजय साजरा करत होता शिवाय कर्णधार अजित वाडेकर यांच्या.
शुभेच्छा देण्यासाठी इंग्लंड संघाचे मॅनेजर केन बॅरिंग्टन (Kane Barrington) ड्रेसिंग रूममध्ये आले आणि अजित वाडेकर यांना झोपेतून उठवलं. सामना संपल्यानंतर, वाडेकर निद्रिस्त डोळ्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये आले आणि इकडे ड्रेसिंग रूममध्ये फारुक इंजिनिअरने सर्व शॅम्पेन संपवून टाकली. जेव्हा वाडेकर परत आल्यावर त्यांना शॅम्पेन एन्जॉय करायची होती पण ती मिळू शकली नाही. त्यांना बीयर नेच विजयाचे सेलिब्रेशन करावे लागले.
अजित वाडेकर यांच्या बालपणीची एक अतिशय मनोरंजक कथा आहे. रुईया महाविद्यालयात शिकत होते. त्यांना वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यायचा होता आणि अभियांत्रिकीचं शिक्षण (engineering) घ्यायचं होतं. रुईयामध्ये राहत असताना अजित वाडेकर शनिवार-रविवारी टेनिस बॉल क्रिकेट खेळायचे. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शिकत असताना ते बसने महाविद्यालयात जात असत.
एके दिवशी बसमध्ये बसल्यावर त्यांचा वरिष्ठ बाळू गुप्ते त्यांच्या शेजारी येऊन बसला. गुप्ते यांनी वडेकरांना विचारले, “तुम्ही संघात खेळणार का?” सुरुवातीला वाडेकर विनयशील पद्धतीने हो म्हणाले पण सामन्यासाठी ३ रुपये मिळतील हे जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्याने लगेचच होकार दर्शविला. वाडेकर यांना १२ वा खेळाडू म्हणून स्थान मिळाले. नंतर बाळू गुप्ते आणि अजित वाडेकर हे भारताकडून खेळले. जेव्हा १९५८ ते १९७२ पर्यंत मुंबईने सलग १५ वेळा रणजी करंडक जिंकले. अजित वाडेकर हे प्रत्येक वेळी त्या संघाचा एक भाग होते.
वाचा –
क्रिकेटला रामराम केल्यावर मॅनेजमेंटची डिग्री घेऊन अमेरिकन एक्सप्रेससाठी काम करणारा क्रिकेटर
आचरेकर सर म्हणत, “प्रवीण हा सचिनपेक्षा काकणभर सरस आहे”
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय