---Advertisement---

कोर्टाने निर्णय दिला अन् महाराष्ट्रातील आयपीएल मॅचेस शिफ्ट केल्या गेल्या, काय होता तो किस्सा?

On: रविवार, जून 12, 2022 4:48 PM
Rising-Pune-Supergiants
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचा कोणताही सीझन सुरू होतो तेव्हा, पहिली मॅच खेळण्याआधीच एखादा वाद सुरु होतो. जसे ‌आयपीएल २०२२ आधी नव्या गुजरात फ्रॅंचाईजीला‌ खेळू देऊ नये म्हणून, आयपीएलचे पहिले कर्ता-करविता आणि सध्या लंडनमध्ये असलेल्या ललित मोदींनी वाद पेटवला. हे वाद सालाबादप्रमाणे सुरू होतात आणि पेल्यातील वादळ बनून शमतातही, पण २०१६ आयपीएलवेळी एक असा वाद रंगला ज्यामुळे महाराष्ट्रातील मॅचेस शिफ्ट कराव्या लागल्या. हा वाद नक्की होता काय? याची सखोल माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया.

२०१६ ची आयपीएल थोडीशी स्पेशल होणार होती. स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर झालेल्या चौकशीत राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांशी संबंधित अधिकारी बेटिंगमध्ये दोषी आढळल्याने या दोन्ही संघांना दोन वर्षासाठी सस्पेंड केले गेले. त्यांच्या जागी गुजरात लायन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या दोन टीम खेळणार होत्या. आयपीएलचा माहोल तयार झाला. ही आयपीएल महाराष्ट्रासाठी थोडीशी आणखी स्पेशल होती. मुंबई आणि पुण्याच्या टीम्स खेळणार म्हणून फॅन्सचा जोश सातव्या आसमानवर पोहोचला होता. सरळ सरळ दोन्ही टीम्स फॅन्सना खरतर शहरवासीयांना हे सिद्ध करायचं होतं की, भारी कोण?

सिझनची पहिलीच मॅच या दोन्ही टीम्समध्ये झाली आणि नवख्या पुण्याने चॅम्पियन मुंबईला मात दिली. पहिला राऊंड तर पुण्याच्या बाजूने गेला. स्पर्धेची सुरुवात धमाकेदार झाली आणि बरोबरीनेच एक मोठा वाद सुरू झाला. वाद होता आयपीएलच्या मॅचेस महाराष्ट्रात न करण्याचा. खरंतर आयपीएल सुरू व्हायच्या आधीच लोकसत्ताने महाराष्ट्रात दुष्काळ असताना, आयपीएलच्या मॅचेस इतरत्र खेळवाव्या म्हणून कोर्टात याचिका दाखल केलेली. तरीही ९ एप्रिलला मुंबई पुण्याची पहिली मॅच पार पडलेली. १३ एप्रिलला या प्रकरणावर सुनावणी झाली आणि मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला की, दुष्काळाच्या भीषण स्थितीत मॅचेस दुसऱ्या राज्यात घ्या. बीसीसीआयने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील केले.

हेही पाहा- जेव्हा महाराष्ट्र सरकार विरोधात बीसीसीआय कोर्टात गेली होती

खरंतर त्यावर्षी महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर बनलेली.‌ लातूरला पाण्याच्या ट्रेन गेल्याच आठवतंय ना तुम्हाला? हे तेच वर्ष. महाराष्ट्र सरकारने राज्यातील तब्बल २९,००० गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेली. पुणे जिल्ह्याच्या १३ तालुक्यातील ५४० गावांना ही समस्या भेडसावत होती.‌ त्यामुळे आयपीएल मॅचेसला पाणी दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा काही संघटनांनी दिला होता. अशा परिस्थितीत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आव्हान बीसीसीआय पुढे होते.

त्या सीझनला महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि नागपूर या तीन ठिकाणी मिळून १९ मॅच खेळल्या जायच्या होत्या. मुंबई-पुण्याच्या प्रत्येकी सात लीग मॅचेस आणि किंग्स इलेव्हन पंजाबच्या दोन मॅचेस नागपुरात व्हायच्या ठरलेलं. बरोबर प्ले ऑफच्या तीन मॅचही होत्याच. या सगळ्या मॅचेसला तब्बल ६० लाख लिटर इतके पाणी‌ लागणार होते. दुष्काळाच्या स्थितीत इतके पाणी उपलब्ध करून देणे अवघड होते. महाराष्ट्र सरकारही त्यानंतर बॅकफुटला गेले आणि त्यांनी हे पाणी देण्यासाठी आपण तयार नसल्याचे घोषित केले.

अखेर २७ एप्रिलला सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि त्यांनीही मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला. आता बीसीसीआयला मॅचेस दुसरीकडे खेळवणे भागच होते. त्यांनी कोर्टाकडून १ मेच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपरजायंट्स मॅचपुरती मुदत वाढवून घेतली. ती मॅच पार पाडून उर्वरित मॅचेस आम्ही दुसरीकडे घेऊ हे आश्वासन दिले. या सर्वात टीम इंडियाचा दिग्गज ऑलराऊंडर युवराज सिंगने ‘फक्त आयपीएलमुळेच महाराष्ट्रात दुष्काळ पडतो का?’ असा सवाल केला. त्यावर वातावरण गरम झाले आणि लोकांनी युवराजला सोशल मीडियाद्वारे चांगलेच सुनावले.

मॅचेस शिफ्ट करणे नक्की झाल्यावर, मुंबई इंडियन्सला आपले होम ग्राउंड जयपूरचे सवाई मानसिंग स्टेडियम हवे होते. त्यांनी तशी मागणी केली पण राजस्थान सरकारने दुष्काळाचेच कारण देत त्यांना स्पष्ट नकार दिला. शेवटी बीसीसीआयने मुंबई आणि पुण्याच्या मॅचेस विशाखापटनममध्ये, पंजाबच्या मॅचेस मोहालीत तर, प्ले ऑफ्स दिल्ली-बंगलोरमध्ये करण्याचा डिसीजन घेतला. अखेर उर्वरित आयपीएल निर्विघ्न पार पडली, पण दुष्काळाचा हा चॅप्टर आयपीएलच्या इतिहासात नक्कीच लिहिला गेला.

https://www.youtube.com/watch?v=pE7Moha4JDA

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

जेव्हा तुटला होता ‘कॅप्टन कूल’ धोनीच्याही संयमाचा बांध, भलताच झालेला ‘अँग्री यंग मॅन’

अंडर- १९ एका देशासाठी अन् इंटरनॅशनल क्रिकेट दुसऱ्या देशाकडून खेळलेले बहाद्दर, यादीत मुंबईकर पठ्ठ्याही सामील

विषये का! चक्क टी२० क्रिकेटमध्येही डबल सेंच्युरी ठोकण्याचा दम राखणारे ४ क्रिकेटर्स, एक भारतीयही सामील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---