fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजाने गमतीने म्हटलेली ही गोष्ट उतरली सत्यात!

सिडनी। ऑस्ट्रेलियाने शनिवारी(12 जानेवारी) भारताविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 34 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यातून ऑस्ट्रेलियाच्या जेसन बर्हेनडॉर्फने शानदार वनडे पदार्पण कले. त्याने भारताच्या डावातील पहिल्याच षटकात सलामीवीर फलंदाज शिखर धवनला बाद केले. विशेष म्हणजे या सामन्याआधी बर्हेनडॉर्फने त्याला पहिल्याच षटकात विकेट मिळायला हवी असे गमतीने म्हटले होते.

याबद्दल सांगताना बर्हेनडॉर्फ म्हणाला, ‘मी पहिल्या षटकात थोडा नर्वस होतो. पण ज्याप्रकारे हे पहिले षटक गेले, त्यापेक्षा अधिक मी काही मागू शकत नाही. मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर गमतीने म्हटले होते की मला माझ्या पहिल्या षटकात विकेट मिळाली तर आवडेल आणि तसे घडलेही.’

त्याचबरोबर तो पुढे म्हणाला, ‘झे रिचर्डसन आणि मी गोलंदाजी करताना चांगली भागीदारी केली. माझे सामर्थ्य हे चेंडू फ्रंटला स्विंग करण्यात आहे. तो चांगल्या वेगात गोलंदाजी करतो. आमची लवकर विकेट घेण्याची योजना होती, जी यशस्वी झाली. पीटर सिडलनेही चांगली गोलंदाजी केली. आमच्या सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. आमची रणनीती साधी होती जी आम्ही यशस्वी केली.’

त्याच्या पदार्पणाबद्दल बर्हेनडॉर्फ म्हणाला, ‘माझ्यासाठी ती संध्याकाळ अविश्वसनीय होती. मी माझे पदार्पण केले आणि स्टार खेळाडू असणाऱ्या भारतीय संघाविरुद्ध विजयही मिळवला. मी खूप आनंदी आहे. माझ्यासाठी मागील 3 वर्षे संघर्षपूर्ण होती. पण मी मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले आहे. मला माझा फॉर्म कायम ठेवायचा आहे.’

बर्हेनडॉर्फने या सामन्यात रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांच्यात चौथ्या विकेटसाठी झालेली 137 धावांची भागीदारीही तोडत ऑस्ट्रेलियाला ब्रेकथ्रू मिळवून दिला होता. त्याने धोनीला 51 धावांवर असताना पायचीत केले होते.

याबद्दलही तो म्हणाला रोहित आणि धोनीला शतकी भागीदारीनंतर बाद करणे महत्त्वाचे ठरले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 288 धावसंख्या उभारत भारतासमोर 289 धावांचे लक्ष ठेवले होते. मात्र भारताला 50 षटकात 254 धावाच करता आल्या.

भारताकडून रोहित शर्माने 133 धावांची शतकी खेळी आणि एमएस धोनीने 51 धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली लढत दिली होती. तसेच या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी रचली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

जेव्हा एमएस धोनी भेटतो त्याच्या ८७ वर्षीय फॅनला…

आयपीएल २०१९ सुरू होण्याआधी या संघाने केली नवीन प्रशिक्षकाची नेमणुक

युवराज सिंगची ती भविष्यवाणी ठरली खरी…

You might also like