---Advertisement---

वेगवान धावा करत नाही म्हणून संघातून वगळले; याचा राग त्याने काढला अभ्यासावर

On: गुरूवार, सप्टेंबर 10, 2020 10:47 AM
---Advertisement---

नवी दिल्ली| भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडला एकदा वनडे क्रिकेट संघातून वगळण्यात आले होते. वेगवान धावा करत नाही म्हणू त्याला लक्ष्य केले गेले.

यावर द्रविड खूप नाराज होता आणि त्यानंतर त्याने कठोर परिश्रम करून पुन्हा भारतीय संघात परत येण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघांचे माजी निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी द्रविडच्या कठीण काळाची आठवण करून दिली.

त्याच्या पुनरागमनाबद्दल बोलतांना प्रसाद म्हणाले, “संघातून बाहेर झाल्यामुळे त्याने आपला राग अभ्यासावर काढला आणि नंतर शानदार शैलीत संघात परतला.”

नुकतेच भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज एमएसके प्रसाद एका स्पोर्टस्किडाच्या फेसबुक पेजवर मुलाखत देत होते. यावेळी राहुल द्रविडवर जेव्हा त्यांना विचारणा केली गेली तेव्हा त्यांना त्याचा हा काळ आठवला.

त्यावेळी प्रसाद आणि द्रविड एकाच अपार्टमेंटमध्ये राहत होते. हे दोन्ही खेळाडू 15 वर्षाखालील संघात एकत्र क्रिकेट खेळत होते. त्यामुळे ते त्याला अधिक चांगल्या प्रकारे ओळखतात.

“तो त्यावेळी एमबीए करत होता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भाग घेतल्यामुळे एमबीएची परीक्षा पूर्ण करू शकला नाही. एकदिवसीय संघातून वगळल्यानंतर त्याला जवळपास 6 महिन्यांचा ब्रेक मिळाला. त्यादरम्यान तो परत आला आणि त्याने परीक्षेचे 13 पेपर दिले.” असे पुढे बोलताना प्रसाद यांनी सांगितले.

द्रविडच्या परिश्रमाबद्दल बोलतांना ते म्हणाले, “मला हे चांगलेच आठवते की फ्लॅटमध्ये असल्याने तो दररोज सकाळी अभ्यासाबरोबरच मेहनत करायचा. मी त्याच्या वेदना समजू शकत होतो. त्याने आपला सर्व राग तेथेच (परीक्षा) काढून टाकला. त्याने एमबीए 75 किंवा 80 टक्के गुणांसह पूर्ण केले आणि त्यानंतरच भारतीय संघात प्रवेश केला आणि त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. 1999 विश्वचषकात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.”

द्रविडने 1999 च्या विश्वचषकात 8 सामने खेळले होते.त्यामध्ये 65.85 च्या सरासरीने 461 धावा केल्या होत्या, ज्यात 2 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश होता. या विश्वचषकात भारतीय संघाचा प्रवास फक्त सुपर सिक्सपर्यंत होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---