---Advertisement---

जेव्हा राहुल द्रविड थेट मुख्यमंत्र्यांनाच करतो गोलंदाजी

On: सोमवार, फेब्रुवारी 10, 2020 3:11 PM
---Advertisement---

भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड तमिळनाडूचे मुख्यमंत्री के पालानीस्वामी यांना गोलंदाजी करताना दिसून आला आहे. झाले असे की पालानीस्वामी सलेम येथे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी द्रविडच्या गोलंदाजीचा सामना केला.

भारताचा माजी कर्णधार द्रविडने पालानीस्वामींना आंडरआर्म गोलंदाजी केली, ज्यावर पालानीस्वामींनी एक शॉट मारत आनंद साजरा केला.

तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार यावेळी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन आणि तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष रुपा गुरुनाथही उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी बोलताना द्रविडने सलेम क्रिकेट फाउंडेशन आणि तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियममधील सुविधांबद्दल कौतुक केले. तो म्हणाला, ‘तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन आणि तमिळनाडू सरकारने सुविधा चांगल्या विकसित केल्या आहेत, हे एक चांगले पाऊल आहे.’

द्रविड पुढे म्हणाला, ‘माझा विश्वास आहे की क्रिकेटपटूंची पुढची पिढी, पुढची पिढीचे हीरो आणि प्रतिभावान खेळाडू छोट्या शहरांतून येतील आणि अशा परिस्थितीत अशा सुविधा त्यांना आपले उद्दीष्ट साध्य करण्यात मदत करतील.’

त्याचबरोबर द्रविडने तमिळनाडूचा वेगवान गोलंदाज टी नटराजनचेही कौतुक केले. तो सलेममधील रहिवासी आहे. द्रविड त्याच्याबाबतीत बोलताना म्हणाला, नटराजन पुढील पिढीच्या खेळाडूंसाठी आदर्श असेल.

तसेच या कार्यक्रमादरम्यान श्रीनिवासन यांनी या नवीन स्टेडियमवर आयपीएलचे सामने आयोजित करण्याची ग्वाही दिली आणि आशा व्यक्त केली की एमएस धोनी कर्णधार असलेला चेन्नई सुपर किंग्सचा संघ या मैदानात सामने खेळेल.

हे स्टेडियम चेन्नई-सलेम महामार्गावर आहे आणि सलेम गावापासून 24 किलोमीटर दूर आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---