---Advertisement---

वेळप्रसंगी रक्त देऊन भारतीय कर्णधाराचा जीव वाचवला, पण ब्लड कॅन्सरमुळेच झाला विंडीजच्या दिग्गजाचा अंत

On: मंगळवार, मार्च 7, 2023 6:00 PM
Sir-Frank-Worrell
---Advertisement---

पन्नासच्या दशकात क्रिकेटविश्वामध्ये सर फ्रँक वॉरेल, सर एवर्टन वीक्स आणि सर क्लाइव्ह वाल्कॉट ही बॅटिंग तिकडी ‘थ्री डब्ल्यू’ नावाने प्रसिद्ध होती. वेस्ट इंडिजच्या या तीनही दिग्गजांचा बार्बाडोस येथे ऑगस्ट 1924 ते जानेवारी 1926 म्हणजे जवळपास 18 महिन्यांच्या कालावधीत जन्म झाला होता. विशेष म्हणजे, या तिघांनीही एकाच वर्षी 1948 ला वेस्ट इंडिज संघात पदार्पण केले होते. आज हे तीनही दिग्गज या जगात नाहीत, तरी वेस्ट इंडिज संघाला क्रिकेटजगतात नाव मिळवून देण्यासाठी या तिघांनी दिलेल्या योगदानाला कोणीही विसरू शकत नाही. केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नव्हेतर, माणूस म्हणूनही महान असलेल्या या तिघांपैकी सर फ्रँक वॉरेल यांनी दाखवलेल्या एका मानवतावादी घटनेचा हा किस्सा.

मार्च 1962ला भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर होता. त्यावेळीच्या कॅरेबियन संघाची अक्षरशः दहशत होती. अपेक्षेप्रमाणे पहिल्या 2 कसोटीत यजमानांनी टीम इंडियाला लोटांगण घालायला लावले. दोन कसोटीनंतर भारतीय संघ बार्बाडोस विरुद्ध चार दिवसांची एक कोलोनियल मॅच खेळणार होता. बार्बाडोसने‌ पहिल्या इनिंगमध्ये 394 धावा केला. टीम इंडिया बॅटिंग करायला उतरली. टीम इंडियाकडून बॅटिंग करायला आले कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर आणि दिलीप सरदेसाई. त्यावेळी समोरच्या संघात बॉलिंगला होते तूफानी चार्ली गिफ्रिथ. तिसऱ्या ओव्हरमध्ये ग्रिफिथ बॉलिंगला आल्यावर स्ट्राइकला होते नरी कॉन्ट्रॅक्टर. त्यावेळी ग्रिफिथ यांच्या बाऊंसर्सची भलतीच दहशत होती. असाच एक बाऊंसर येऊन थेट कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्याच्या उजव्या भागावर लागला. ते क्षणार्धात मैदानावर कोसळले. दुखापत गंभीर वाटत होती.

अशावेळी व्हीआयपी बॉक्समध्ये बसून मॅचचा आनंद घेत असलेल्या सर वॉरेल यांना घटनेचे गांभीर्य समजले. ते थेट मैदानात उतरले. टीम इंडियाचे मॅनेजर गुलाम अहमद यांच्याशी चर्चा करून वॉरेल यांनी कॉन्ट्रॅक्टर यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्याची सोय केली. ते स्वतः तिथे पोहोचले. फोर्ड नावाच्या डॉक्टरांनी सुचित केले की, शक्य तितक्या लवकर ऑपरेशन झाले नाहीतर जीवावर बेतू शकते. महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी बी पॉझिटिव्ह रक्तगट हवा होता.

तिकडे मॅच थांबली गेलेली. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हॉस्पिटलकडे धाव घेतली. बापू नाडकर्णी, पॉली उम्रीगर, चंदू बोर्डे, पत्रकार प्रभू आणि सर फ्रँक वॉरेल या पाच जणांचा रक्तगट बी पॉझिटिव्ह होता. त्यापैकी रक्त देण्यासाठी सर्वप्रथम तयार झाले सर वॉरेल. वेळेवर रक्त मिळाल्याने कॉन्ट्रॅक्टर यांचा जीव वाचला. मात्र, त्यांचं क्रिकेट करियर कायमचं संपल. पण, वॉरेल यांनी तेव्हा दाखवलेली समय सूचकता आणि औदार्य कायमचं सर्वांच्या लक्षात राहिल. सर फ्रँक वॉरेल यांच्या परोपकाराला कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य कधीच विसरू शकले नाहीत. ऑगस्ट 1963 मध्ये वॉरेल कसोटी क्रिकेटमधून रिटायर झाले. मात्र, नशिबाचा खेळ पाहा, आपले रक्त देऊन विरुद्ध संघाच्या कर्णधाराचा जीव वाचवणाऱ्या या सज्जन क्रिकेटपटूचा आणि महान व्यक्तीचा मृत्यू ब्लड कँन्सरमुळे झाला. 1967 साली वयाच्या केवळ 42व्या वर्षी वॉरेल हे जग सोडून गेले.

पुढे केवळ कॉन्ट्रॅक्टर कुटुंबीयच नव्हेतर बंगाल क्रिकेट असोसिएशनने त्यांचा सन्मान करायचे ‌ठरवले. 1981 पासून सीएबीने दरवर्षी आपला स्थापना दिवस असलेला 3 फेब्रुवारी‌ हा दिवस ‘सर फ्रँक वॉरेल दिवस’ म्हणून साजरा करायला सुरुवात केली. या दिवशी सीएबी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करते. रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी सही केलेले प्रमाणपत्र दिले जाते.

वेस्ट इंडिज क्रिकेटचे पहिले कृष्णवर्णीय कर्णधार असलेल्या याच वॉरेल यांनी विविध बेटांना एक समूह करत, वेस्ट इंडिज असं नाव दिलं. त्यांच्याच दूरदृष्टीने वेस्ट इंडिजने बराच काळ क्रिकेटजगतावर राज्य केलं. आजही क्रिकेटविश्वातील सर्वात आनंददायी संघ म्हणून याच वेस्ट इंडिजला ओळखलं जातं. विविध संस्कृतीने नटलेल्या याच वेस्ट इंडिजमुळे जग क्रिकेटला एन्जॉय करू लागलं.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेंटलमन्सच्या खेळात ऑस्ट्रेलियन खेळाडूने दिलेली भारतीय सलामीवीराला धमकी, पण मागे हटेल तो भारतीय कसला
तेव्हा ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या रक्ताचे भुकेले होते इंग्लिश बॉलर्स, डॉन ब्रॅडमन यांच्यासाठी आखलेला डाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---