१९९१-९२ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय टीम अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली गेली होती. भारताचे महान अष्टपैलू आणि १९८३ च्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव अजूनही खेळत होते तर सोबतीला श्रीकांत, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, सिद्धू अशी जुनीजाणती मंडळीदेखील होती. हळूहळू नाव कमवू लागलेला टीनएजर सचिन तेंडुलकर सुद्धा होता.
त्या संघात एका १९ वर्षाच्या तरुण खेळाडूची देखील निवड झाली होती. बंगालसाठी घरेलू क्रिकेटमध्ये खोर्याने धावा काढून त्याने भारतीय संघासाठी आपली दावेदारी ठोकली होती. पण, पहिला दौरा आणि तोही ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर म्हटल्यावर ती एक परीक्षाच ठरणार होती.
कसोटी मालिकेआधी, भारत, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज दरम्यान वनडे तिरंगी मालिका होणार होती. वेस्टइंडीज सोबतची पहिली मॅच टाय झाली तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवत मालिकेची चांगली सुरुवात केली पण तिथून पुढे भारताची गाडी रूळावरून घसरण्यास सुरुवात झाली. पुढे वेस्टइंडीजला एकदा हरवले मात्र ऑस्ट्रेलियाने दोनदा मात दिली. भारताचे मालिकेच्या अंतिम फेरीत जाण्याचे मनसुबे धुळीस मिळवू लागले.
शेवटच्या नवव्या सामन्यात सौरव गांगुलीला पदार्पणाची संधी मिळाली मात्र ब्रिस्बेनच्या त्या वेगवान गोलंदाजांसाठीच्या पिचवर कॅरेबियन गोलंदाजांचा तो सामना करू शकला नाही आणि १३ चेंडूत ३ धावाकरून तो माघारी परतला. सचिनने सर्वाधिक ७७ धावा केल्या. पुढे भारतीय संघ सामना हरला आणि मालिकेतून बाहेर पडला.
या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत एक- एक करत चार सामने हरला होता. शेवटच्या औपचारिक सामन्यात तरी आपल्याला संधी मिळेल असे तरुण सौरवला वाटले. पण, शेवटी तेही झाले नाही आणि त्या मालिकेत तो बाकावरच बसून राहिला. पुढे त्याला भारतात पाठवून दिले गेले. काही दिवसानंतर १९९२ च्या विश्वचषकासाठीच्या संघातही त्याला जागा मिळू शकली नाही.
गांगुलीला तडकाफडकी भारतात पाठवण्याच्या घटनेवर अनेक प्रसारमाध्यमांनी आपली पोळी भाजून घेतली. अनेक वावड्या उठल्या गेल्या. गांगुलीच्या वर्तणुकीवर आक्षेप घेतला गेला होता. काहींच्या मते,
“त्यावेळी गांगुलीने सीनियर खेळाडूंशी वाद घातला होता. राखीव असल्याने त्याला कपिल देव व अझरुद्दीन यांच्यासाठी मैदानावर पाणी घेऊन जाण्यास सांगितले. तेव्हा त्याने, मी येथे खेळायला आलोय पाणी पाजायला नाही. असे उलट उत्तर दिले होते.”
यातील सत्यता किती हे माहीत नाही. पण, गर्भश्रीमंत घरातून आलेल्या गांगुलीने कनिष्ठ स्तरावर असा प्रकार केला होता याची उदाहरणे तेव्हाचे बंगालचे खेळाडू देतात.
आपल्यावरील सर्व आरोप गांगुलीने आपल्या “A Century Is Not Enough” या पुस्तकात खोडून काढत सांगितले की,
“त्यावेळी भारतीय संघात, उत्तर भारतीय खेळाडूंचा एक, दक्षिण भारतीय खेळाडूंचा एक आणि मुंबईकर खेळाडूंचा एक असे गट होते आणि मी यापैकी कशातच बसत नव्हतो.”
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्व वरिष्ठ खेळाडू आपापल्या फॉर्मशी झगडत होते. तेव्हा संजय मांजरेकरने आपला राग विनाकारण गांगुलीवर काढला होता आणि त्यासंबंधी स्पष्टीकरण दिले नव्हते.
गांगुलीचे आपला रूममेट सचिनसोबत चांगले जुळत होते. दोघे समवयीन होते आणि अंडर १५ च्या स्पर्धांपासून त्यांची ओळख होती. दोघांची आवडनिवड एकसमान होती. सचिनला झोपेत चालायची सवय होते आणि गांगुली त्याची काळजी घेत. इतर खेळाडू मात्र, गांगुलीला जास्त मदत करत नसत.
ज्यावेळी, गांगुलीला भारतात परत पाठविण्याविषयी बातमी दिली गेली तेव्हा तो रडवेला झाला. तो रूममध्ये येऊन बॅग भरत असताना अल्लड सचिन त्याला म्हटला की,
“तू जात आहेसच तर तुझी बॅट देऊन जा”
त्यावर गांगुलीने जरा रागातच,
“टीममधून बाहेर काढले आहे आता बॅटसुद्धा घ्या आणि मी जातो हात हलवत.”
असे उत्तर दिले. काही वेळाने त्याचा राग शांत झाला आणि त्यांनी ती बॅट सचिनला दिली. पुढे, याच
बॅटने त्याने वर्ल्डकपमध्ये भल्याभल्या गोलंदाजांना धडकी भरवली.
ऑस्ट्रेलियातून भारतात परतताना गांगुलीने “मी पुन्हा येईन” असा निश्चय केला होता. पुढील चार वर्ष क्रिकेटमध्ये धावांची रास उभी केली. फिटनेस सुधारला आणि पुन्हा एकदा निवड समितीला आपली दखल घ्यायला भाग पाडले. १९९६ च्या इंग्लंड दौऱ्यातील लॉर्ड्स कसोटीत शतक भारत त्याने यशस्वी पुनरागमन केले.
त्यानंतर, भारताचा कर्णधार ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष अशी चढती कामगिरी त्याने केली.