---Advertisement---

कुणी समालोचक तर कुणी पोलीस दलात, जाणून घ्या २००७ च्या विश्वचषक संघाचे महारथी काय करत आहेत

On: गुरूवार, ऑक्टोबर 21, 2021 4:37 PM
2007 T20 Worldcup Team India
---Advertisement---

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ सालचा पहिला टी -२० विश्वचषक उंचावला होता. तो विश्वविजेता संघ तरुण खेळाडूंनी भरलेला होता कारण त्यावेळी संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंनी विश्वचषक न खेळण्याचा निर्णय घेतला होता. तरीही संघात काही अनुभवी खेळाडू होते. धोनीच्या नेतृत्वाखाली हा संघ विश्वचषक जिंकेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती, पण या संघाने इतिहास घडवला होता. आजपर्यंत त्याची पुनरावृत्ती झालेली नाही. त्या ऐतिहासिक विजयाचा भाग असलेले खेळाडू आज काय करत आहेत. याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

महेंद्रसिंग धोनी
या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता. तो प्रथमच भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवत होता. सध्या तो काय करत आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्याने अलीकडेच चेन्नई सुपर किंग्सला आपल्या नेतृत्वाखाली आयपीएल -२०२१ चे विजेतेपद मिळवून दिले आहे. सध्या सुरू असलेल्या टी -२० विश्वचषक २०२१ मध्ये तो भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहे.

युवराज सिंग
युवराज सिंगने २००७ च्या विश्वचषक संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. युवराजने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकातील सहा षटकार कोणीही विसरू शकणार नाही. युवराज २०१९ पर्यंत आयपीएल खेळला होता. त्याने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी तो रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये खेळताना दिसला होता.

वीरेंद्र सेहवाग
वीरेंद्र सेहवाग हा त्या संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक होता. दुखापतीमुळे तो अंतिम सामना खेळू शकला नव्हता. पण त्याने संपूर्ण विश्वचषकात शानदार फलंदाजी केली होती. सध्या तो समालोचनासह सोशल मीडियावर देखील व्यस्त असतो.

गौतम गंभीर
गौतम गंभीरशिवाय २००७ चा विश्वचषक संघाचा उल्लेख करणे अपूर्ण ठरेल. त्याने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी केली होती. अंतिम सामन्यातही त्याने अर्धशतक करत संघाला संकटातून बाहेर काढले होते. सध्या तो विविध मुद्यांवर भाष्य करण्यात तसेच राजकारणातही हात आजमावण्यात व्यस्त आहेत.

रॉबिन उथप्पा
रॉबिन उथप्पा हे त्यावेळी भारतीय क्रिकेटचे उदयोन्मुख नाव होते. त्याने त्याच्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. उथप्पा सध्या भारतीय संघाचा भाग नाही पण तो आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळला होता.

रोहित शर्मा
रोहित शर्मा हा त्यावेळेचा तरुण फलंदाज आज भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. सध्या चालू असलेल्या विश्वचषकात, २००७ विश्वविजेत्या संघाचा रोहित हा एकमेव सदस्य आहे.

दिनेश कार्तिक
दिनेश कार्तिक देखील सध्या भारतीय संघाचा भाग नाही, पण सध्या तो एक सक्रिय क्रिकेटपटू आहे. तो नुकताच आयपीएल २०२१ मध्ये खेळताना दिसला होता.

युसुफ पठाण
युसुफ पठाण २००७ च्या विश्वचषकात फक्त एकच सामना खेळला, तोही अंतिम सामन्यात. २०१९ च्या आयपीएलमध्ये तो शेवटच्या वेळी सनरायझर्स हैदराबादकडून खेळतांना दिसला होता. तो अबू धाबी टी २० लीग -२०२१ मध्ये मराठा अरेबियन्सकडून खेळताना दिसणार आहे.

अजित आगरकर
अजित आगरकर हा त्या संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू होता. तो सध्या एका वाहिणीसाठी समालोचक करत आहे.

पियुष चावला
पियुष चावला विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. तो अजूनही खेळत आहे. आयपीएल -२०२१ मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला होता.

जोगिंदर शर्मा
त्या विश्वचषकानंतर जोगिंदर शर्माचे नाव अजरामर झाले. त्याने पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या अंतिम सामन्यात शेवटचे षटक टाकले आणि संघाला विजयाकडे नेले होते. सध्या तो हरियाणा पोलीस दलात कार्यरत आहे.

हरभजन सिंग
हरभजन सिंग हा सुद्धा अनुभवी खेळाडूंमध्ये समाविष्ट होता. हरभजन अद्याप निवृत्त झालेला नाही. तो आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाचा भाग होता.

रुद्र प्रताप सिंग
रुद्र प्रताप सिंगने भारताला विश्वचषक मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. हा डावखुरा गोलंदाज २०१८ मध्ये निवृत्त झाला होता. तो आता विविध विषयांवर भाष्य करत असतो. तसेच, तो अबू धाबी टी २० लीगमध्ये खेळताना दिसू शकतो.

इरफान पठाण
इरफान पठाणही त्या विश्वविजेत्या संघाचा भाग होता. सध्या तो निवृत्त झाला आहे आणि काही दिवसांपूर्वी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये खेळताना दिसला होता. तसेच तो समालोचक करण्यात व्यस्त असतो.

एस. श्रीसंत
श्रीसंतने शेवटचा झेल टिपला ज्यामुळे भारतीय संघ विश्वविजेता बनला होता. मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर मोठ्या मुश्किलीने त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे, तो सध्या केरळकडून खेळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला

दसऱ्याच्या दिवशी कुंबळे आणि श्रीनाथने भारताला करून दिले होते विजयाचे सीमोल्लंघन

मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी कर्नाटकचा संघ जाहीर! आयपीएल गाजवणाऱ्या बड्या नावांचा समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---