आयपीएल 2024 मधील दिल्ली कॅपिटल्सच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्यांच्या प्रवासात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. दिल्लीनं या हंगामात 14 सामने खेळले, ज्यापैकी सात जिंकले तर सात सामन्यांमध्ये त्यांना पराभव पाहावा लागला.
दिल्लीला या आयपीएल हंगामात विजयाची लय कायम राखता आली नाही. या हंगामात संघाचा कर्णधार रिषभ पंतनं पुनरागमन केलं, जो दिल्लीसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू राहिला. जरी दिल्लीला आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलं नाही, परंतु त्यांना पुढील हंगामासाठी एक मजबूत संघ तयार करायचा आहे. चला तर मग, या बातमीद्वारे जाणून घेऊया अशा चार खेळाडूंबद्दल, ज्यांना दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2025 साठी आपल्या संघात कायम ठेवू शकते.
रिषभ पंत – धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत डिसेंबर 2022 मध्ये कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. यामुळे तो आयपीएल 2023 मध्ये खेळू शकला नाही. तो आयपीएलच्या या हंगामात परतला आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक धावा केल्या. पंतनं आयपीएल 2024 मध्ये 13 सामन्यांत 40.5 च्या सरासरीनं 446 धावा केल्या. त्यानं आता कर्णधार म्हणून जम बसवला आहे, असं म्हणता येईल. पंत डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज असल्यानं त्याला आयपीएल बाजारात मोठी मागणी आहे. तो सध्या एक हंगाम खेळण्यासाठी 16 कोटी रुपये घेतो.
अक्षर पटेल – अक्षर पटेल गेल्या 5 हंगामांपासून दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. तो सध्या संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. जर आपण अक्षरच्या वैयक्तिक कामगिरीवर नजर टाकली, तर त्यानं 2024 च्या हंगामात 14 सामने खेळताना 235 धावा केल्या आणि 11 बळी घेतले. अक्षर हा निश्चितच आयपीएल 2024 च्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होता. या हंगामात खेळण्यासाठी त्याला 12 कोटी रुपये मिळाले होते.
कुलदीप यादव – कुलदीप यादव 2022 पासून दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे. या ‘चायनामन’ फिरकीपटूनं या हंगामात 16 विकेट घेतल्या. महत्त्वाच्या क्षणी विकेट घेण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे, दिल्ली कॅपिटल्सची टीम त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडण्याची शक्यता नाही. कुलदीपला सध्या एक हंगाम खेळण्यासाठी 2 कोटी रुपये मिळतात.
जेक फ्रेझर मॅकगर्क – ऑस्ट्रेलियाचा 22 वर्षीय जेक फ्रेजर मॅकगर्क अल्पावधीतच फ्रँचायझी क्रिकेटचा सुपरस्टार बनला आहे. तो ‘बिग बॅश लीग’मध्ये मेलबर्न रेनेगेड्स आणि युएई टी20 लीगमध्ये ‘दुबई कॅपिटल्स’कडून खेळला आहे. यावर्षी त्याचं आयपीएल पदार्पण झालं. पदार्पणातच तो 15 चेंडूत 50 धावा करून दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू बनला. मॅकगर्कनं आयपीएल 2024 मध्ये 234 च्या धडाकेबाज स्ट्राईक रेटनं 330 धावा ठोकल्या. मॅकगर्कला दिल्लीनं 50 लाख रुपयांना करारबद्ध केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या –
दिनेश कार्तिक पाठोपाठ आता ‘गब्बर’ही करणार क्रिकेटला अलविदा? शिखर धवनच्या निवृत्तीबाबत काय आहे अपडेट?