कोणत्याही क्रिकेटपटूला त्याच्या राष्ट्रीय संघाकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळणे स्वप्नवतच असते. राष्ट्रीय संघात जागा मिळवण्यासाठी ते देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा किंवा आयपीएलमध्ये आपले सर्वोत्कृष्ट देताना दिसतात. यानंतरही बऱ्याचशा शिलेदारांची प्रतिक्षा फळाला येत नाही. सौराष्ट्र क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज शेल्डन जॅक्सन हादेखील भारतीय संघात निवड होण्याची वाट पाहात आहे. वयाची तिशी ओलाडूंनही त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करण्याची आस सोडलेली नाही. वयाला निवडीचे निकष बनवल्याने त्याने संताप व्यक्त केला आहे.
क्रिकेट नेक्स्ट वेबसाइटला बोलताना जॅक्सनने आपली कारकिर्द, निवडकर्त्यांचे दुर्लक्ष आणि निवडीसाठी वयाचा मुद्दा, अशा गोष्टींवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
निवडीसाठी वयाची अट अयोग्य
तो म्हणाला की, “क्रिकेटच्या नियमांमध्ये असे कुठे लिहिले आहे की, जर तुमचे वयच ३० पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला राष्ट्रीय संघात निवडणे योग्य नाही. नियुक्तीसाठी एखाद्या खेळाडूमधील कोणत्या कौशल्याला पारखले जाते? रणजी क्रिकेटमधील धावा? खेळाडूची तंदुरुस्ती की अजून काही?. जर एखादा खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये मागील काही हंगामांपासून सातत्याने ८०० पेक्षा जास्त धावा करत असेल; तर याचा नेमका काय अर्थ घ्यायचा. तो खेळाडू फिट असेल म्हणूनच तर इतका वेळ मैदानावर उभा राहून धावा करत असेल.”
माझ्या विक्रमाविषयी कोणच बोलत नाही
३४ वर्षीय जॅक्सन हा विस्फोटक फलंदाजी करणारा खेळाडू आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला आहे. रणजी ट्रॉफी क्रिकेटमधील आपल्या एका शानदार विक्रमाविषयी बोलताना जॅक्सन म्हणाला की, “माझा एक असा विक्रम आहे, ज्याच्याविषयी कोणीही बोलत नाही. मी रणजी ट्रॉफी क्रिकेटमध्ये १०० हून अधिक षटकार मारले आहेत. या स्वरुपात सहसा फलंदाज संयमी खेळी करण्यावर जर देतात. परंतु याउलट मी जास्त जोखीम घेतो. यावरुन दिसून येते की माझ्याकडे माझा मुलभूत खेळ आहे.”
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन
जॅक्सनची देशांतर्गत क्रिकेटमधील आकडेवारी उल्लेखनीय राहिली आहे. त्याने २०१९-२० रणजी ट्रॉफी हंगामात १८ डावात ५० पेक्षा जास्त सरासरीने फलंदाजी करताना ८०९ धावा केल्या होत्या. यासह तो सौराष्ट्र संघाकडून या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याच्या फलंदाजीतील योगदानामुळे सौराष्ट्रने अंतिम सामन्यात बंगालला पराभूत करत रणजी ट्रॉफी पटकावली होती. यापुर्वीच्या रणजी ट्रॉफी हंगामातही त्याने ४७.४४ च्या सरासरीने ८५४ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
असं कोण धावबाद होतं भावा!! पाहा व्हायरल होत असलेला व्हिडिओ
किवी कर्णधार विलियम्सन इंग्लंडविरुद्ध पहिल्याच डावात फ्लॉप; अँडरसनने केले सुरेखरित्या क्लीनबोल्ड