टी-20 वर्ल्ड कप 2026 सुरू व्हायला आता अवघे दोन दिवस उरले आहेत. 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या क्रिकेटच्या या महाकुंभात फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात तसे तर अनेक दिग्गज फलंदाजांनी आपली चमक दाखवली आहे, पण एका फलंदाजाने मैदानावर असा कहर केला की विरोधी गोलंदाज अक्षरशः दयेची भीक मागताना दिसले.
या स्फोटक फलंदाजाने अवघ्या 47 चेंडूंमध्ये शतक ठोकून जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. हा विक्रम करणारा दुसरा कोणी नसून ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल आहे.
टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. 2016 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात गेलने अवघ्या 47 चेंडूत शतक झळकावून जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता, जो आजपर्यंत कायम आहे. त्या सामन्यात गेलने इंग्लिश गोलंदाजांची दाणादाण उडवली होती आणि नाबाद 100 धावांची तुफानी खेळी खेळली होती.
या खेळीदरम्यान त्याने 5 चौकार आणि 11 उत्तुंग षटकार लगावले असून त्याचा स्ट्राईक रेट 208.33 चा होता. विशेष म्हणजे, टी-20 वर्ल्ड कपमधील दुसरे सर्वात वेगवान शतकही गेलच्याच नावावर आहे, जे त्याने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ 50 चेंडूत पूर्ण केले होते.





