टी20 विश्वचषकाचा पहिला सामना धुमधडाक्यात पार पडला. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात ॲरॉन जोन्सनं आपल्या स्फोटक फलंदाजीनं सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. त्यानं आपल्या फलंदाजीनं अमेरिकेला एकतर्फी विजय मिळवून दिला. यानंतर आता सर्वत्र त्याच्या नावाचीच चर्चा सुरू आहे.
डॅलस येथे खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेनं कॅनडाचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कॅनडाच्या संघानं निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 194 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, अमेरिकेनं 17.4 षटकांत केवळ 3 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं. अमेरिकेकडून ॲरॉन जोन्सनं 40 चेंडूंत 4 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीनं नाबाद 94 धावा केल्या. यासह त्यानं अमेरिकेसाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रमही रचला.
या उत्कृष्ट कामगिरीनंतर आता सर्वांना ॲरॉन जोन्सबद्दल जाणून घ्यायचं आहे. चला तर मग, या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला ॲरॉन जोन्स कोण आहे आणि त्याचं करिअर कसं आहे, याबद्दल सांगणार आहोत.
ॲरॉन जोन्सचा जन्म 19 ऑक्टोबर 1994 रोजी क्वीन्स, न्यूयॉर्क येथे झाला. जानेवारी 2016 मध्ये त्यानं लिस्ट ए पदार्पण करून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. नंतर त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रवेश केला आणि 2017-18 मध्ये चार दिवसीय स्पर्धेत बार्बाडोससाठी पदार्पण केलं. एप्रिल 2019 मध्ये त्यानं पापुआ न्यू गिनीविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. नामिबियातील 2019 आयसीसी क्रिकेट लीग डिव्हिजन टू स्पर्धेत त्याच्या उल्लेखनीय कामगिरीनं यूएसएला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
ॲरॉन जोन्सच्या करिअरची आकडेवारी त्याचं या खेळातील सातत्य दाखवते. त्यानं एकदिवसीय सामन्यांमध्ये 36.35 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 28.11 च्या सरासरीनं फलंदाजी केली आहे. त्यानं आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1454 धावा आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 478 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 94 धावा आहे, जी त्यानं या विश्वचषकात कॅनडाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात केली.
महत्त्वाच्या बातम्या –
अमेरिका-कॅनडाचा क्रिकेट इतिहास आहे 180 वर्ष जुना! ‘या’ वर्षी खेळला गेला होता पहिला सामना
विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात लगावला 103 मीटरचा षटकार! मैदानावरील सर्वच थक्क; पाहा VIDEO
यजमान अमेरिकेची विश्चचषकात विजयाने सुरुवात, कॅनडाचा 7 विकेट्सनी केला पराभव