भारत-बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
सामन्याचं पहिलं सत्र बांगलादेशच्या नावे राहिलं. टीम इंडियानं पहिल्या सत्रात रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुबमन गिलच्या विकेट्स गमावत 88 धावा केल्या. भारताचे हे टॉप-3 फलंदाज केवळ 34 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्यानंतर रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल या जोडीनं चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत डाव सांभाळला.
कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्याच तासात बांगलादेशचा युवा वेगवान गोलंदाज हसन महमूदनं रोहित, गिल आणि विराट कोहलीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या 24 वर्षीय युवा वेगवान गोलंदाजाची अप्रतिम गोलंदाजी पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. हा गोलंदाज आहे तरी कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडतोय.
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज हसन महमूद त्याच्या वेगासाठी तसेच उत्कृष्ट स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यानं 2020 मध्ये बांगलादेशसाठी टी20 फॉरमॅटद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. चार वर्षांनंतर त्याला 2024 मध्ये कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. या 24 वर्षीय गोलंदाजानं पदार्पणाच्या कसोटीत एकूण 6 बळी घेतले, ज्यात दुसऱ्या डावातील 4 बळींचा समावेश आहे.
हसन मेहमूद वेगवान गोलंदाजी करताना विशिष्ट लाईन आणि लेन्थला चिकटून राहतो. त्याच्या या क्षमतेमुळे त्याला बांगलादेशातील उत्कृष्ट उगवता गोलंदाज म्हणून ओळख मिळाली आहे. 2019 अंडर-19 विश्वचषक दरम्यान तो सर्वप्रथम जगासमोर आला. स्पर्धेतील सहा सामन्यांत त्यानं 19.33 च्या सरासरीनं नऊ विकेट्स घेतल्या होत्या.
हसन महमूदचा हा केवळ चौथा कसोटी सामना आहे. त्यानं पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये एकूण 8 बळी घेतले होते. यामध्ये एका डावातील 5 बळींचा समावेश आहे. बांगलादेशनं या मालिकेत पाकिस्तानचा 2-0 असा व्हाईटवॉश केला होता.
हससनं चेन्नई कसोटीच्या पहिल्या सत्रात 7 षटकं टाकली, ज्यात 2 मेडन षटकांचा समावेश होता. त्यानं एकूण 14 धावा देत 3 महत्त्वाचे बळी घेतले.
हेही वाचा –
‘केवळ 94 धावांनी शतक हुकलं…’, चेन्नई कसोटीत रोहित शर्मा फ्लॉप; सोशल मीडियावर चाहत्यांनी घेरलं
धोनीचा मोठा विक्रम आता धोक्यात, रिषभ पंतची वेगानं घोडदौड सुरु
चेन्नईत असं का केलं?, रोहितच्या या निर्णयानं चाहते हैराण!