आयपीएल 2024 पूर्वी जेक फ्रेझर मॅकगर्कला फार कमी लोक ओळखत होते. मात्र आता या 22 वर्षीय ऑस्ट्रेलियन फलंदाजानं आपल्या दमदार फलंदाजीनं संपूर्ण क्रिकेट विश्वावर आपली छाप सोडली आहे. मॅकगर्कनं आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत 5 सामन्यात 247 धावा केल्या आहेत. त्यानं लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. या सामन्यात त्यानं 55 धावांची धडाकेबाज खेळी खेळून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती.
कोण आहे जेक फ्रेझर मॅकगर्क?
जेक फ्रेझर मॅकगर्क हा एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म 11 एप्रिल 2002 रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झाला. मॅकगर्कनं कॅरी बॅप्टिस्ट ग्रामर स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. तो त्याच्या आक्रमक आणि तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जातो. 2023 मध्ये त्यानं ऑस्ट्रेलियन डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळताना तस्मानियाविरुद्ध अवघ्या 29 चेंडूत शतक झळकावलं होतं. अशाप्रकारे तो क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा खेळाडू आहे.
मॅकगर्कनं आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 16 सामने खेळताना 550 धावा केल्या आहेत. त्याच्या लिस्ट-1 कारकिर्दीत त्यानं 21 सामन्यांत 525 धावा केल्या आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या या तुफानी फलंदाजानं 41 टी-20 सामने खेळत 808 धावा ठोकल्या आहेत. मॅकगर्गनं फेब्रुवारी 2024 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत खेळलेल्या 2 वनडे सामन्यांमध्ये त्यानं 221.73 च्या स्ट्राईक रेटनं 51 धावा केल्या आहेत.
मॅकगर्कचा आयपीएलचा पगार किती?
आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी दुखापतीमुळे अख्या हंगामातून बाहेर पडला. त्यानंतर दिल्लीनं एनगिडीच्या जागी जेक फ्रेझर मॅकगर्कला संघात सामील केलं. दिल्लीनं त्याला त्याच्या मूळ किमतीत संघात समावेश केला आहे. म्हणजेच मॅकगर्कला आयपीएलच्या एका हंगामासाठी 20 लाख रुपये मिळतात. मात्र त्याची कामगिरी पाहता त्याची किंमत आता कोटींच्या घरात पोहचली असेल, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय, घरच्या मैदानावर दिला मुंबई इंडियन्सला धोबीपछाड
अन् रिषभ पंत भर मैदानात उडवायला लागला पतंग! पाहा व्हायरल व्हिडिओ
पांड्या-बुमराह कोणालाच सोडलं नाही! ‘मॅकगर्क’ नावाच्या वादळासमोर मुंबईचे गोलंदाज पाचोळ्यासारखे उडाले