भारताची सध्या आॅस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. पण या मालिकेतील दुसरा सामना सुरु असतानाच भारताला आज(17 डिसेंबर) मोठा धक्का बसला आहे. भारताचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ डाव्या पायाच्या घोट्याच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे.
त्याच्या ऐवजी उर्वरित कसोटी मालिकेसाठी 27 वर्षीय फलंदाज मयंक अगरवालची निवड करण्यात आली आहे. मयंक मागील काही महिन्यांपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याची याआधी विंडीजविरुद्ध आॅक्टोबरमध्ये पार पडलेल्या कसोटी मालिकेसाठीही भारतीय संघात निवड झाली होती. मात्र त्याला एकाही कसोटी सामन्यात अंतिम 11 जणांच्या संघात संधी देण्यात आली नाही.
या मालिकेनंतर त्याला आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले. पण आता पुन्हा शॉ दुखापतीमुळे बाहेर पडल्याने मयंकला संधी देण्यात आली आहे.
कोण आहे मयंक अगरवाल-
कर्नाटकचा असणारा मयंक अगरवाल मागील काही वर्षांपासून देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. तसेच त्याची भारत अ संघाकडूनही चांगली कामगिरी झाली आहे.
त्याचा नुकत्याच भारत अ संघाने केलेल्या न्यूझीलंड दौऱ्यातही भारतीय संघात समावेश होता. या दौऱ्यात त्याने दोन कसोटी आणि दोन वनडे अशा चार सामन्यात मिळून 39.60 च्या सरासरीने 198 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे. या दौऱ्यात भारताकडून त्याने दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या आहेत.
तसेच त्याने सप्टेंबरमध्ये विंडीज विरुद्धच्या सराव सामन्यात 90 धावा केल्या होत्या. त्याआधी त्याची यावर्षी जून जुलै महिन्यात भारतीय अ संघाने केलेल्या इंग्लंड दौऱ्यातही निवड झाली होती. यात त्याने तीन शतके आणि एक अर्धशतकासह 8 सामन्यात 56.77 च्या सरासरीने 511 धावा केल्या होत्या. तसेच चौरंगी मालिकेतही भारत ब संघाकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली होती.
त्याचबरोबर 2017-18 च्या रणजी ट्रॉफी मोसमातही तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने या मोसमात 13 डावात 105.45 च्या सरासरीने 1160 धावा केल्या होत्या.
2017-18च्याच मोसमात त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने 8 डावात 723 धावा केल्या होत्या.
तसेच मयंकचा 2010 च्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठीही भारतीय संघात समावेश होता. या स्पर्धेत त्याने 27.83 च्या सरासरीने 6 सामन्यात 167 धावा केल्या होत्या.
मयंकने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 46 प्रथम श्रेणी सामन्यात 49.98 च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 75 सामन्यात 48.71 च्या सरासरीने 3605 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–बॉक्सिंग डे कसोटीसाठी या दोन प्रतिभावान खेळाडूंचा टीम इंडियात समावेश?
–मोठी बातमी: भारताला मोठा धक्का, पृथ्वी शॉ कसोटी मालिकेला मुकणार
–Video: आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मुरली विजयला कोहलीबद्दल असे काही बोलला की ऐकून थक्क व्हाल!
–कोहली-पेनमधील वाद काही मिटेना, अखेर मैदानावरील अंपायरनेच केली मध्यस्थी