इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 43वा सामना लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. हा सामना बेंगलोर संघाने 18 धावांनी जिंकला. या सामन्यानंतर लखनऊ संघाचा खेळाडू नवीन-उल-हक सातत्याने चर्चेत आहे. विराट कोहली याच्यासोबत बाचाबाची केल्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. बीसीसीआयनेदेखील या खेळाडूवर आयपीएलच्या आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी सामना शुल्काच्या 50 टक्के दंड ठोठावला आहे. अशात अफगाणिस्तानचा हा वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये त्याच्या गोलंदाजीपेक्षा जास्त विराटसोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. चला तर कोण आहे नवीन उल हक आणि तो आयपीएलपर्यंत कसा पोहोचला, हे जाणून घेऊयात…
बालपणीपासूनच भारत होता आवडता संघ
सन 1999मध्ये काबुल येथे जन्मलेल्या नवीन-उल-हक (Naveen-ul-Haq) याच्या बालपणाची अनेक वर्षे पाकिस्तानातच गेली. अफगाणिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती असल्यामुळे त्याचे कुटुंब पाकिस्तानात राहायचे. त्यावेळी अफगाणिस्तान सहयोगी संघही नव्हता. तसेच, भारत नवीनचा आवडता संघ होता. इरफान पठाण, एस श्रीसंत आणि जहीर खान हे त्याचे आवडते खेळाडू होते.
भावासोबत नेहमी भांडायचा
नवीन बालपणीपासूनच त्याच्या भावांसोबत टेप बॉल क्रिकेट खेळायचा. तो यष्टीरक्षक फलंदाज होता. मात्र, दोन्ही भावांमध्ये नेहमी खटके उडायचे. ते एकमेकांविरुद्ध खेळायचे. जेव्हा नवीनने पहिल्यांदा लेदर चेंडू पाहिला, तेव्हा त्याने गोलंदाज बनण्याचा आणि क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. भावाची मदत मिळाल्यामुळे त्याच्या वडिलांनीही संमती दिली आणि नवीनला क्रिकेट अकादमीमध्ये पाठवले.
नवीन सुरुवातीला खूपच सामान्य होता, पण काळानुसार तो खूपच चांगला गोलंदाज होत गेला. पाकिस्तानहून परतल्यानंतर तो 11 वर्षांच्या वयात अफगाणिस्तानच्या 16 वर्षांखालील संघासाठी खेळत होता. जेव्हा तो 15 वर्षांचा झाला, तेव्हा देशाच्या 19 वर्षांखालील संघाचा भाग बनला. 17 वर्षांच्या वयात त्याने त्याच्या देशाच्या मुख्य संघासाठी पहिला सामना खेळला आणि यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.
आयपीएलमध्ये कसा पोहोचला?
अफगाणिस्तानसाठी 7 वनडे सामन्यात 14 विकेट्स आणि फक्त 5.79च्या इकॉनॉमी रेटने धावा देणाऱ्या नवीनने कमी काळात आयपीएल फ्रँचायझीकडून खेळताना दिसत आहे. त्याने आतापर्यंत 27 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 34 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, 8.11च्या इकॉनॉमी रेटने धावा खर्च केल्या आहेत. तो जगातील टी20 लीगमध्ये चांगली कामगिरी करत आला आहे. त्यामुळेच त्याचा आयपीएल लिलावातही समावेश झाला. मात्र, लखनऊव्यतिरिक्त इतर कोणत्याही संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला नाही आणि त्याला मूळ किंमतीत म्हणजेच 50 लाखात संघात सामील केले. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 4 सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, फक्त 6.12च्या इकॉनॉमी रेटने धावा खर्च केल्या आहेत. मात्र, तो विराट कोहलीसोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आला आहे.
वादाशी जुने नाते
नवीन यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. श्रीलंका प्रीमिअर लीगच्या सहाव्या सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि नवीन यांच्यात वाद झाला होता. कँडी टस्कर्सने सामन्यात गाले ग्लेडिएटर्सला 25 धावांनी पराभूत केले होते. सामन्यादरम्यान नवीन हा ग्लेडिएटर्स संघाचा गोलंदाज मोहम्मद आमिर याच्याविरुद्ध अपशब्द वापरताना दिसला होता. अशात मुनाफ पटेलसह टस्कर्सच्या वरिष्ठ खेळाडूंनी युवा अफगाणिस्तानच्या गोलंदाजाला मारामारी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, पण नवीन भिडण्यासाठी सज्ज होता. सामन्यानंतर जेव्हा दोन्ही संघाचे खेळाडू हातमिळवणी करत होते, तेव्हा आफ्रिदी आणि नवीन एकमेकांच्या समोर आले. आफ्रिदीने हसत नवीनला विचारले की, तो आमिरला काय म्हणत होता? त्यावेळी उत्तर देत नवीनने अपमानास्पद उत्तर दिले. त्यानंतर आफ्रिदीही रागाने लाल झाला होता.
विराटशी कसा भिडला?
लखनऊ विरुद्ध बेंगलोर (Lucknow vs Bangalore) सामन्यात विराट कोहली याने धावत येऊन नवीनला काहीतरी म्हटले. त्यानंतर नवीनही काहीतरी बोलला. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. सामन्यानंतर जेव्हा दोन्ही खेळाडू हातमिळवणी करत होते, तेव्हा विराट आणि नवीन उल हक भिडले. विराट हा नवीनपेक्षा खूपच वरिष्ठ खेळाडू आहे, पण नवीनने कधीच त्याच्या वरिष्ठ खेळाडूंचा आदर केला नाही. त्यामुळे त्याला सामना शुल्काच्या 50 टक्के दंड ठोठावला गेला. (who is naveen ul haq who had verbal exchange with virat kohli in rcb vs lsg ipl 2023 know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आधी मैदानात नंतर इंस्टावर, नवीनने घेतला विराटशी पंगा! म्हणाला, ‘तू हेच डिझर्व करतो…’
‘विरोधी संघाचा आदर करा…’, विराट आणि गंभीर एकमेकांना भिडताच कुंबळेची मोठी प्रतिक्रिया