30 जुलैचा दिवस भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरला. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत सरबज्योत सिंग आणि मनू भाकर यांच्या जोडीनं कांस्यपदक पटकावलं. हे भारताचं या ऑलिम्पिकमधील दुसरं पदक आहे. विशेष म्हणजे, भारताची दोन्ही पदकं नेमबाजीत आले आहेत.
मनू भाकरचं हे या ऑलिम्पिकमधील दुसरं पदक आहे. यासह ही एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. तुम्ही सर्वांनी मनू भाकरबद्दल तर बरंच काही वाचलं असेल, मात्र तिच्यासोबत पदक जिंकणारा सरबज्योत सिंग कोण आहे, हे तुम्हाला माहित आहे का? नाही ना! चला तर मग, या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला सरबज्योत सिंग बद्दल माहिती सांगतो.
22 वर्षीय सरबज्योत जन्म 30 सप्टेंबर 2001 रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला. आपलं पहिलंच ऑलिम्पिक खेळत असलेल्या सरबज्योतनं वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी नेमबाजीला सुरुवात केली होती. सरबज्योतनं उन्हाळी शिबिरात काही मुलांना एअर गन शूट करताना पाहिलं होतं. त्यानंतर त्यानं हा खेळ खेळण्याचा निर्णय घेतला.
सरबज्योतनं अंबाला येथील एआर अकादमी ऑफ शूटिंग स्पोर्ट्समध्ये प्रशिक्षण सुरू केलं. तो त्याचे वडील जितेंद्र यांना आपला सर्वात मोठा आदर्श मानतो. आपल्या यशाचं श्रेय तो त्याचा मित्र आदित्य मलरा यालाही देतो. सरबज्योत सांगतो की, आदित्य पहिल्या दिवसापासून त्याच्यासोबत आहे आणि त्यानं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला प्रेरणा दिली आहे.
सरबज्योतनं चँगवॉन, कोरिया येथे झालेल्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2023 मध्ये दोन पदकं जिंकली होती. त्यानंतर त्यानं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात रौप्यपदक आणि पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक पटकावलं. या कांस्यपदकामुळे तो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कोटा मिळवण्यात यशस्वी ठरला.
सरबज्योतनं गतवर्षी झालेल्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर त्याच्या वाढदिवशी त्यानं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेतही रौप्यपदक जिंकलं. हा त्याच्यासाठी अतिशय संस्मरणीय क्षण होता. 2023 मध्ये भोपाळ येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्येही सरबज्योतनं सुवर्णपदक जिंकलं होतं.
22 वर्षीय सरबज्योतनं अनुभवी नेमबाज समरेश जंग यांच्याकडून राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण घेतलं आहे. अभिषेक राणा त्याचा वैयक्तिक प्रशिक्षक आहे. 2023 मध्ये सरबज्योतनं पंजाब विद्यापीठातून कला शाखेत पदवी प्राप्त केली. सरबज्योतला इंग्रजी, हिंदी आणि पंजाबी भाषा बोलता येतात.
हेही वाचा –
इतिहास घडला!! मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीचा कांस्यपदकावर निशाणा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देणारी नेमबाजी स्पर्धा कशी खेळली जाते? नियम व अटी काय असतात?
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनिका बत्रानं रचला इतिहास, यजमान फ्रान्सच्या खेळाडूला हरवून केला मोठा उलटफेर