सुरत। मंगळवारी(24 सप्टेंबर) भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात (India Women vs South Africa Women) 5 टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने 11 धावांनी विजय मिळवला.
या सामन्यातून भारताकडून 15 वर्षीय शेफाली वर्माने (Shafali Verma) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. पदार्पण करताच ती भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पदार्पण करणारी सर्वात युवा क्रिकेटपटू ठरली.
मिताली राजने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने शेफालीला संघात संधी मिळाली. ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी भारताची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात युवा क्रिकेटपटू आहे. तिने जेव्हा मंगळवारी पदार्पण केले तेव्हा तिचे वय 15 वर्षे 239 दिवस होते.
या यादीत अव्वल क्रमांकावर गार्गी बॅनर्जी आहेत. त्यांनी 1978 मध्ये 14 वर्षे 165 दिवस एवढे वय असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
शेफालीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 1923 धावा केल्या आहेत. मात्र तिच्यासाठी तिचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण खराब झाले. ती चौथ्याच चेंडूवर शून्य धावेवर बाद झाली.
शेफाली लहानपणापासून तिच्या वडीलांबरोबर आणि भावाबरोबर सराव करायची. तिने वयाच्या 13 व्या वर्षी हरियाणाच्या 19 वर्षांखालील संघात स्थान मिळवले.
आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार शेफाली तिच्या वडीलांबरोबर करत असलेल्या सरावाबद्दल म्हणाली, ‘मला सुरुवातीला माझ्या वडीलांनी ट्रेनिंग दिली. भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावे हे माझे आणि माझ्या वडीलांचे स्वप्न आहे.’
अनेक युवा क्रिकेटपटूंप्रमाणे शेफालीसाठीही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आदर्श आहे. हरियाणातील रोहतकची असणाऱ्या शेफालीने सचिनला 2013 मध्ये हरियाणातील बन्सी लाल स्टेडीयममध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत फलंदाजी करताना पाहिले होते.
शेफाली यावर्षी झालेल्या महिला आयपीएलमध्येही मिताली राजने नेतृत्व केलेल्या वेलोसिटी संघाकडून खेळली. या स्पर्धेत तिने 3 सामन्यात 47 धावा केल्या होत्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–आपल्याला अशीही काही शिक्षा होईल याचा शेन वॉर्नने जन्मातही विचार केला नसेल !
–ती घटना ज्यामुळे विराटला मिळाली आयसीसीकडून शिक्षा, पहा व्हिडिओ
–अनुभवी तमिळ थलायवाज प्ले-ऑफमधून बाहेर, तर हे दोन संघ प्ले-ऑफसाठी ठरले पात्र