ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालने (Yashsvi jaiswal) तुफानी फलंदाजी करत शतक झळकावले आणि टीमला मजबूत स्थितीत पोहोचवले. त्यावर इरफान पठानने (Irfan Pathan) यशस्वीची मनापासून प्रशंसा करत त्याला जगातील सर्वोत्कृष्ट डावखुरा फलंदाज म्हटलं. यशस्वीने 164 चेंडूंमध्ये 118 धावा केल्या, ज्यात चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली.
भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी इंग्लंडपुढे मोठं लक्ष्य ठेवावं लागणार होतं आणि हे काम यशस्वीने जबरदस्त शतकी खेळी करून केलं. दुसऱ्या डावात सलामीला आलेल्या या 23 वर्षीय फलंदाजाने 164 चेंडू खेळत 71.95 स्ट्राइक रेटने 118 धावांची खेळी केली. त्यात 14 चौकार आणि 2 शानदार षटकार होते. पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाने प्रतिस्पर्ध्यापुढे विजयासाठी 396 धावांचे लक्ष्य ठेवले.
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठानने (Irfan Pathan) आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटलं, यशस्वी जयस्वाल पाहा, शतकाने सुरुवात केली आणि शतकानेच मालिका संपवली. कमाल आहे. यापेक्षा चांगला डावखुरा फलंदाज संपूर्ण जगात मला वाटत नाही.
चौथ्या दिवशी भारतीय संघाची पूर्ण ताकद ही ठरली की ते प्रतिस्पर्ध्याला लवकरात लवकर बाद करून ओव्हल कसोटी सामना जिंकतील. तर इंग्लंड संघ आपली झुंजार खेळी दाखवून सामना फिरवण्याचा प्रयत्न करेल. सध्या यजमान संघ पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पुढे आहे.






