राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीच्या मालकी हक्कावरून सध्या जोरदार युद्ध सुरू आहे. लक्ष्मी एन. मित्तल आणि आदित्य मित्तल यांनी अदार पूनावाला यांच्यासोबत मिळून राजस्थान रॉयल्स (RR) फ्रँचायझी सुमारे १.६५ अब्ज अमेरिकन डॉलर्सना विकत घेतली आहे. ही रक्कम भारतीय चलनात सुमारे १५,६६० कोटी रुपये इतकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या टीममधील ७५ टक्के हिस्सा मित्तल कुटुंबाकडे, १८ टक्के अदार पूनावाला यांच्याकडे आणि उर्वरित ७ टक्के हिस्सा सध्याच्या गुंतवणूकदारांकडे राहील. मात्र, या संपूर्ण व्यवहारानंतर काल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील गटाने कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
’क्रिकबझ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, सोमानी ग्रुपने राजस्थान टीमच्या विक्री प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा सोमानी ग्रुप यापूर्वी राजस्थान रॉयल्स विकत घेण्याच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर असल्याचे सांगितले जात होते. त्यांनी आरोप केला आहे की, गेल्या १० दिवसांपासून ते डील फायनल होण्याची प्रतीक्षा करत होते, परंतु त्यांना अंधारात ठेवून मागच्या दाराने मित्तल कुटुंबासोबत हा व्यवहार पूर्ण करण्यात आला. याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवण्यात येणार असून बीसीसीआयलाही (BCCI) या घटनेची कल्पना दिली जाणार असल्याचे समोर आले आहे.
काल सोमानी हे अमेरिकेत वास्तव्यास असून त्यांनी अमेरिकन उद्योगपती रॉब वॉल्टन आणि हॅम्प कुटुंबासोबत मिळून राजस्थान टीम खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यांनी असा दावा केला आहे की, एकीकडे त्यांच्याशी बोलणी सुरू होती, मात्र त्यांच्यासोबतचा व्यवहार पूर्ण करण्यास जाणीवपूर्वक विलंब लावला गेला.
क्रिकबझच्या याच अहवालानुसार, काल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील गटाला पैसे भरण्यासाठी एका महिन्याचा वेळ देण्यात आला होता, परंतु ते वेळेत पैसे भरू शकले नाहीत. सोमानी ग्रुपने यावर तीव्र आक्षेप घेत अशा सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत. आम्ही हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे तयार होतो, असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील एका अन्य सूत्राने माहिती दिली की, राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनाकडून ९० टक्के कागदपत्रे प्रलंबित होती आणि त्यांनी हे जाणीवपूर्वक केले. काल सोमानी यांना अमेरिकेतील अत्यंत श्रीमंत कुटुंबांचा पाठिंबा असल्याने, त्यांच्यासाठी पैसे भरणे ही कधीच समस्या नव्हती.




