बॉर्डर-गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. आघाडीचा स्टार फलंदाज शुबमन गिलच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं. यामुळे तो 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. भारताच्या शेवटच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या विजयातील नायकांपैकी एक असलेला गिल हा भारतीय फलंदाजीचा मुख्य आधार आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची आघाडीची फळी कमकुवत दिसू शकते. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा फलंदाजांबद्दल सांगणार आहोत, जे या सामन्यात त्याच्या ऐवजी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात.
विराट कोहली – रोहित शर्मा पत्नीच्या बाळंतपणामुळे पर्थ कसोटी खेळणार नाही. अशा परिस्थितीत अभिमन्यू ईश्वरन यशस्वी जयस्वालसह डावाची सुरुवात करू शकतो आणि विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. केएल राहुलला कोहलीच्या जागी चौथ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. विराट अनेक वेळा कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे. अलीकडेच गिल न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीतून बाहेर पडला होता, ज्यानंतर कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.
ध्रुव जुरेल – ध्रुव जुरेलनं ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सामन्यात आघाडीची फळी कोसळल्यानंतर शानदार फलंदाजी केली होती. यासह त्यानं मधल्या फळीत आपला दावा मजबूत केला आहे. मेलबर्न येथे झालेल्या सराव सामन्यातील पहिल्या डावात जुरेलनं 186 चेंडूत 80 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्यानं 122 चेंडूत 68 धावा केल्या. ध्रुव जुरेल भारतासाठी तीन कसोटी खेळला आहे. गिलच्या अनुपस्थितीत तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
अभिमन्यू ईश्वरन – पर्थ कसोटीत रोहित शर्माच्या जागी सलामीला केएल राहुल किंवा अभिमन्यू ईश्वरन यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते, असं बोललं जात होतं. मात्र गिलच्या दुखापतीमुळे समीकरणं बदलली आहेत. यशस्वीसह जर राहुल सलामीला आला, तर अभिमन्यू ईश्वरन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.
केएल राहुल – भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर केएल राहुलला वरच्या फळीत संधी देण्यास उत्सुक आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघ रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत गंभीर केएल राहुलबद्दल म्हणाला होता की, “राहुल टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करू शकतो, तो तिसऱ्या किंवा सहाव्या क्रमांकावरही खेळू शकतो.” अशा स्थितीत गिल बाहेर पडल्यास राहुलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सांगितलं जाऊ शकतं.
सरफराज खान किंवा रिषभ पंत – ऑस्ट्रेलियावर दडपण आणण्याची रणनीती लक्षात घेता आक्रमक फलंदाजी सरफराज खान किंवा रिषभ पंत यांना तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं जाऊ शकतं. पंत टी20 मध्ये नंबर-3 वर फलंदाजी करतो. त्यामुळे कसोटीतही तो या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो.
हेही वाचा –
देवदत्त पडिक्कलला संधी मिळणार? शमीबाबत बोर्डाची स्पष्ट भूमिका; टीम इंडियाचे सर्व अपडेट जाणून घ्या
पाकिस्तानी चाहत्यांनी भर मैदानात बाबर आझमची लाज काढली, ट्रोल करतानाचा VIDEO व्हायरल
आर अश्विन मोडू शकतो कपिल देवचा मोठा रेकॉर्ड, फक्त मालिकेत संधी मिळायला हवी!