चेन्नई सुपर किंग्स (CSK) सध्या नवीन प्रशिक्षकाचा शोध घेत आहे. 2009 ते 2026 पर्यंत संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिलेल्या स्टीफन फ्लेमिंग (Steefan Fleming) यांनी आपल्या पदावरून पायउतार होत इंग्लंडच्या कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारली आहे. सीएसके फ्रँचायझीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) काशी विश्वनाथन यांनी नवीन प्रशिक्षकाबाबत मोठी अपडेट दिली आहे. तसेच, सध्या हार्दिक पंड्याला (Hardik pandya) संघात घेण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे फ्रँचायझीने स्पष्ट केले आहे.
नवीन प्रशिक्षक निवडण्यापूर्वी संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (M.S Dhoni and Ruturaj Gaikwad) आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्याशी सल्लामसलत केली जाईल. म्हणजेच त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की, हार्दिक पंड्याच्या ट्रेडवर सध्या कोणतीही चर्चा सुरू नाही. चेन्नई संघ यात रस दाखवत असल्याची चर्चा होती, मात्र नवीन प्रशिक्षकाची निवड झाल्यानंतरच पंड्याबाबत विचार केला जाऊ शकतो, असे सीईओ म्हणाले. असे झाल्यास, गेल्या वर्षी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja & Sam Curren) आणि सॅम करन यांना रिलीज करून संजू सॅमसनला (Sanju Samson) संघात घेतल्यावर ही संघाची सलग दुसऱ्या वर्षीची सर्वात मोठी डील ठरेल.
चेन्नई सुपर किंग्सने स्पष्ट केले आहे की, हार्दिक पंड्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. हा सर्व विषय नवीन प्रशिक्षक ठरवतील. रिपोर्टनुसार, सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले, आम्ही यावर अद्याप विचार सुरू केला नाही. आधी आम्ही प्रशिक्षक निवडू. आम्हाला अनेक इच्छुक उमेदवारांचे फोन आले आहेत. आम्ही सर्वजण एकत्र बसून अंतिम निर्णय घेऊ.
विश्वनाथन आणि सीएसकेच्या होल-टाइम डायरेक्टर रूपा गुरुनाथ हे दोघे एमएस धोनी आणि ऋतुराज गायकवाड यांच्याशी चर्चा करून नवीन प्रशिक्षकाची अंतिम निवड करतील. जर त्यानंतर हार्दिक पंड्या ट्रेडसाठी उपलब्ध असेल, तर त्यावर विचार केला जाऊ शकतो. विश्वनाथन यांच्या मते, नवीन प्रशिक्षक बहुधा एखादा परदेशी तज्ज्ञ असू शकतो.
याआधी आलेल्या एका रिपोर्टमध्ये, ब्रेंडन मॅक्युलम चेन्नईचे नवे मुख्य प्रशिक्षक होऊ शकतात, असे म्हटले होते. मॅक्युलम यांनी इंग्लंडच्या कसोटी संघाचे प्रशिक्षक होण्यासाठी फ्लेमिंगला मदत केली होती, आणि आता फ्लेमिंग त्यांना मदत करू शकतात, अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत.






