भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या टीकेचा बळी ठरत आहे. टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली. भारताला तब्बल 12 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता 37 वर्षीय रोहितच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, रोहितनंतर कोणते तीन खेळाडू भारताचे पुढील कसोटी कर्णधार बनू शकतात, हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.
(3) श्रेयस अय्यर – 29 वर्षीय श्रेयस अय्यरनं 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र, बीसीसीआयच्या काही गोष्टी मान्य न केल्यामुळे त्याला वार्षिक करारातून बाहेर करण्यात आलं. आता तो भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यानं नुकतेच रणजी ट्रॉफीमध्ये शतक झळकावलंय.
अय्यरकडे कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. तो एक यशस्वी कर्णधार आहे. रोहितच्या कर्णधारपदासोबतच त्याच्या संघातील स्थानावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा स्थितीत अय्यरचं संघात पुनरागमन होऊ शकतं. अय्यरची दीर्घकाळ उपलब्धता लक्षात घेता तो कर्णधारपदासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
(2) जसप्रीत बुमराह – जसप्रीत बुमराह सध्या भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. म्हणजेच रोहित शर्माच्या अनुपस्थितीत तो कर्णधारपद भूषवताना दिसेल. बुमराहनं जुलै 2022 मध्ये इंग्लंडमध्ये भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व केलं होतं. याशिवाय आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो किमान एका सामन्यात भारताचा कर्णधार असणार आहे.
30 वर्षीय बुमराह गेल्या आठ वर्षांपासून सतत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये खूप यशस्वी खेळाडू आहे. रोहितनंतर बुमराहला कसोटी कर्णधार बनवलं जाऊ शकतं. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं दाखवून दिलं आहे की वेगवान गोलंदाज देखील चांगला आणि यशस्वी कर्णधार बनू शकतात. हे बुमराहच्या बाबतीतही खरं ठरू शकतं.
(1) रिषभ पंत – रिषभ पंतला भारताचा कसोटी कर्णधार बनवावं, अशी मागणी बऱ्याच काळापासून सुरू आहे. मात्र आजतागायत त्याला ही संधी मिळालेली नाही. सध्या कसोटीत यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पंत भारताची पहिली पसंती आहे. वर्षभरापेक्षा अधिक काळ संघाबाहेर राहुनही पंतला तो तंदुरुस्त होताच थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं. यावरून तो संघासाठी किती महत्त्वाचा आहे हे दिसून येतं.
पंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत नेतृत्व करत आहे. तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. त्यानं फलंदाजीतही स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळे या रेसमध्ये तो सर्वात आघाडीवर आहे.
हेही वाचा –
“हे शाळेतल्या मुलांप्रमाणे खेळतात”, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूनं उडवली टीम इंडियाची खिल्ली
‘या’ कारणांमुळे मोहम्मद रिझवानला मिळालं पाकिस्तान संघाचं कर्णधारपद
पाकिस्तानला मिळाला नवा कर्णधार! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पीसीबीची मोठी घोषणा