न्यूझीलंडमध्ये पार पडलेल्या टी २० तिरंगी मालिकेत आज अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर डकवर्थ लुईस नियमाने १९ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे त्यांनी आयसीसी टी २० क्रमवारीत ५ स्थानांची प्रगती करून दुसरे स्थान मिळवले आहे.
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचे गुण १२६ झाले असून या क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या पाकिस्तान संघाचेही गुण १२६ च आहेत. पण या दोन्ही संघाच्या गुणांमध्ये डेसिमल पॉइंट्सचा फरक असल्याने पाकिस्थान संघ अव्वल स्थानी कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये ०.१९ इतक्या डेसिमल पॉइंट्सचा फरक आहे. सध्या पाकिस्तानचे गुण १२५.८४ आहेत. तर ऑस्ट्रेलियाचे गुण १२५.६५ इतके आहेत.
या तिरंगी मालिकेत इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाचा समावेश होता यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाने अंतिम फेरी गाठली होती. आज झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १५० धावा केल्या होत्या.
या आव्हानाचे प्रतिउत्तर देताना ऑस्ट्रेलियाच्या डोर्सी शॉर्टने अर्धशतक झळकावताना ऑस्ट्रेलियाला विजयाच्या समीप नेले होते. पण ऑस्ट्रेलियाचा डाव सुरु असताना १४.४ षटके झाल्यानंतर पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ऑस्ट्रेलियाला १९ धावांनी तिरंगी मालिकेचा विजेता घोषित करण्यात आले.