दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला आणि ऑस्ट्रेलिया संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवले. डेविड वॉर्नरला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. मात्र, या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बाबर आझमने सहा सामन्यांत सर्वाधिक धावा केल्या होत्या; पण, वॉर्नरची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाल्यावर शोएब अख्तरनेही प्रतिक्रिया दिली. अख्तर याच्या मते बाबर आझम याची या पुरस्कारासाठी निवड व्हायला हवी होती.
बाबर आझमने सहा सामन्यात ६० च्या सरासरीने ३०३ धावा केल्या, तर डेविड वॉर्नरने ७ सामन्यात ४८ च्या सरासरीने २८९ धावा केल्या. बाबर आझम धावसंख्येच्या बाबतीत नक्कीच पुढे आहे. पण प्रभावाच्या बाबतीत डेविड वॉर्नर त्याच्या पुढे आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजेतेपदावर डेविड वॉर्नरच्या फलंदाजीचा मोठा प्रभाव पडला आहे.
बाबर आझमने भारताविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना नाबाद ६८ धावांची खेळी केली होती. या सामन्यात त्याच्यासोबत मोहम्मद रिझवाननेही नाबाद अर्धशतक झळकावले. अशा परिस्थितीत दोघांचेही समान योगदान होते. एकट्या बाबरचा प्रभाव मानता येणार नाही. याशिवाय या सामन्यात गोलंदाजांचा प्रभाव अधिक होता. यामुळेच शाहीन शाह आफ्रिदीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
यानंतर बाबर आझम न्यूझीलंडविरुद्ध फ्लॉप ठरला आणि अफगाणिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावले. या सामन्यात आसिफ अलीच्या झंझावाती चार षटकारांचा प्रभाव होता. पुढच्या दोन सामन्यांमध्ये बाबर आझमने नामिबिया आणि स्कॉटलंडविरुद्ध अर्धशतके झळकावली, पण या संघांकडे कमकुवत संघ म्हणून पाहिले जाते. उपांत्य सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३९ धावा केल्या, ज्यामध्ये पाकिस्तानचा पराभव झाला.
दुसरीकडे, डेविड वॉर्नरबद्दल बोलायचे झाले तर, सलग तीन सामन्यांत त्याने ऑस्ट्रेलियासाठी दमदार फलंदाजी केली आहे. डेविड वॉर्नरने वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ८९ धावांची खेळी केली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला असता, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला असता. त्यामुळे ही खेळी प्रभावी ठरली. यानंतर उपांत्य फेरीत लक्ष्याचा पाठलाग करताना डेविड वॉर्नरने तुफानी फलंदाजी करत पाकिस्तानविरुद्ध संघाला विजय मिळवून दिला. यावेळी त्याने ४९ धावा केल्या.
त्यानंतर अंतिम फेरीत पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला चांगल्या फलंदाजीची आणि सुरुवातीची गरज होती आणि वॉर्नरने ५३ धावा केल्या. अशाप्रकारे या तिन्ही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये डेविड वॉर्नरचा कमालीचा प्रभाव राहिला आहे. दुसरीकडे, बाबर आझमच्या खेळींमध्ये तो दिसला नाही. वॉर्नरने श्रीलंकेविरुद्धही अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे डेविड वॉर्नरला त्याच्या प्रभावी फलंदाजीमुळे स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
मिशेल मार्शने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्यामागे ‘हे’ कारण, स्वत:च केलाय खुला
‘लग्न करायचे होते, तर युसूफ पठाणशी करायचे’, जेव्हा सानिया मिर्झाला कवितेतून मिळाला होता अजब सल्ला
टी२० विश्वचषक जिंकल्याबद्दल न्यूझीलंडचे अभिनंदन? ‘या’ भारतीय क्रिकेटरने ट्वीटमध्ये केली मोठी गडबड