गतविजेता चेन्नई सुपर किंग्जचा संघ यावर्षी प्लेऑफमध्ये देखील पोहोचू शकला नाही. त्यांचा शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 27 धावांनी पराभव झाला. आरसीबी आणि सीएसके या दोघांचेही प्रत्येकी 14 गुण होते, परंतु चांगल्या नेट-रन रेटमुळे, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला.
महेंद्रसिंग धोनीनं आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी सीएसकेचं कर्णधारपद सोडलं. यानंतर ऋतुराज गायकवाडनं कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. ऋतुराजनं शानदार फलंदाजी करत 14 सामन्यात 583 धावा केल्या. परंतु कर्णधार म्हणून तो संघाला प्लेऑफमध्ये पोहचवू शकला नाही. चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये न पोहोचण्यामागे काही मोठी कारणं आहेत. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला या कारणांबद्दल सांगणार आहोत.
वेगवान गोलंदाजांना झालेल्या दुखापती आणि खेळाडूंची अनुपलब्धता
या संपूर्ण हंगामात चेन्नईचा संघ वेगवान गोलंदाजांना झालेल्या दुखापतीमुळे आणि काही खेळाडूंच्या अनुपलब्धतेमुळे त्रस्त राहिला. मथिशा पाथिराना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनं ग्रस्त होता. ज्यामुळे तो फक्त 6 सामने खेळू शकला. तर झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानही आयपीएल अर्धवट सोडून मायदेशी परतला. वेगवान गोलंदाज दीपक चहर या हंगामातही दुखापतीशी झुंजताना दिसला. दुखापतीमुळे तो फक्त 8 सामने खेळू शकला. यामुळे सीएसकेची वेगवान गोलंदाजी खूपच कमकुवत झाली. इंग्लंड-पाकिस्तान मालिकेमुळे फिरकीपटू मोईन अलीही शेवटच्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता.
धोनीनं खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येणं
कर्णधारपद सोडल्यानंतर एमएस धोनीनं या हंगामात जबरदस्त फलंदाजी केली. 42 वर्षीय धोनीनं 11 डावात 220.54 च्या तुफानी स्ट्राइक रेटनं 161 धावा ठोकल्या. तथापि, उत्कृष्ट फॉर्ममध्ये असूनही धोनी बहुतेक सामन्यांमध्ये खालच्या क्रमांकावर फलंदाजीला आला. धर्मशाला येथे झालेल्या सामन्यात तर तो शार्दुल ठाकूरपेक्षाही खाली फलंदाजीला आला होता. या हंगामात धोनीनं जर थोड्या वरच्या क्रमांकावर फलंदाजी केली असती, तर सीएसकेचं नशीब बदलू शकले असतं. धोनी गेल्या काही काळापासून गुडघ्याच्या समस्येनं त्रस्त आहे. कदाचित त्यामुळेच तो फलंदाजीला उशीरा येत होता.
दुसऱ्या हाफमध्ये शिवम दुबेचा खराब फॉर्म
मधल्या फळीतील फलंदाज शिवम दुबेचा फॉर्म मोक्याच्या क्षणी खराब झाला. आयपीएल 2024 च्या पहिल्या 9 सामन्यांमध्ये दुबेनं 350 धावा केल्या होत्या. त्याची सरासरी 58.33 एवढी होती. परंतु पुढच्या 5 सामन्यात शिवमच्या बॅटमधून फक्त 46 धावा निघाल्या. या दरम्यान तो दोनदा शून्यावरही बाद झाला. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात शिवमनं 15 चेंडूत केवळ 7 धावा केल्या.
अजिंक्य रहाणेचा फ्लॉप शो
अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे यंदाच्या हंगामात पूर्णपणे फ्लॉप ठरला. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये रहाणेला मधल्या फळीत संधी देण्यात आली. त्यानंतर त्याला सलामीलाही पाठवण्यात आलं. मात्र रहाणेला काही आपली छाप सोडता आली नाही. रहाणेनं आयपीएल 2024 मध्ये 13 सामने खेळले, ज्यात त्याला केवळ 242 धावा करता आल्या. या काळात रहाणेची सरासरी 20.16 आणि स्ट्राइक रेट 123.46 होता. रहाणेच्या गेल्या वर्षीच्या आकड्यांच्या ही अगदी उलट आहे. रहाणेनं गेल्या वर्षी 14 सामन्यांत 326 धावा केल्या होत्या. या काळात त्याची सरासरी 32.60 आणि स्ट्राईक रेट 172.49 एवढा होता.
रचिन-मिशेलची निराशाजनक कामगिरी
आयपीएल 2024 मध्ये न्यूझीलंडचे आंतरराष्ट्रीय खेळाडू रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी बॅटनं निराशाजनक कामगिरी केली. रवींद्रनं 10 सामन्यांत 22.20 च्या सरासरीनं 222 धावा केल्या. रचिनला केवळ एका सामन्यात 50 धावांचा टप्पा ओलांडता आला. तर डॅरिल मिशेलनं 13 सामन्यांत 28.90 च्या सरासरीनं 318 धावा केल्या, ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ठरलं! एलिमिनेटर सामन्यात आरसीबीशी भिडणार हा संघ, क्वालीफायर 1 मध्ये या दोन संघांत लढत