24 फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 2 टी20 आणि 5 वनडे सामन्यांच्या मालिकांना सुरुवात होणार आहे. या मालिकांसाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 आणि वनडे अशा दोन्ही मालिंकासाठी केएल राहुलला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फॉर्म मागील काही महिन्यांपासून खराब आहे. पण त्याने भारत अ संघाकडून इंग्लंड लायन्स विरुद्ध खेळताना चांगली कामगिरी केली होती.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या टी20 आणि वनडे मालिका मे महिन्यात सुरु होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच पर्यायी सलामीवीर म्हणून राहुलचा विचार केला जात असल्याचे भारताच्या निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितले आहे.
हॉटस्टारवरील एका मुलाखतीत प्रसाद म्हणाले, ‘विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत तिसऱ्या सलामीवीराशिवाय खेळणे शक्य नाही. त्याचमुळे केएल राहुलचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकांसाठी भारताच्या संघात समावेश करण्यात आला. आता आपल्याला पहावे लागेल तो कशी कामगिरी करतो कारण त्याचा फॉर्म खूप महत्त्वाचा आहे.’
भारतीय संघाकडून मागील काही वर्षांपासून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन नियमितपणे सलामीला फलंदाजी करतात. पण तिसरा सलामीवीर हा प्रश्न मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट वर्तुळात चांगलाच चर्चेत आहे.
भारताचे माजी महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी म्हटले आहे की दिनेश कार्तिकचा सलामीवीर म्हणून विचार करावा तर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज शेन वॉर्नने सलामीवीरासाठी रिषभ पंतचे नाव पुढे केले आहे.
पंतचाही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकांसाठी भारताच्या 15 जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
त्याच्या निवडीबद्दल प्रसाद म्हणाले, ‘आम्ही त्याचा समावेश केला आहे कारण तो डावखूरा फलंदाज आहे. त्यामुळे त्याच्यासाठी योग्य जागा शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. डावखूरा फलंदाज संघात असल्याने डाव्या-उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांचे मिश्रण फायदेशीर ठरते.’
असा आहे टी२० मालिकेसाठी भारतीय संघ- विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, विजय शंकर, केएल राहुल, , जसप्रीत बुमराह, युझवेद्र चहल, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, मयांक मार्कंडे
असा आहे पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ- विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायडू, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, विजय शंकर, केएल राहुल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, सिद्धार्थ कौल, कुलदीप यादव, युझवेद्र चहल, रिषभ पंत
असा आहे उर्वरित तीन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ- विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायडू, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, विजय शंकर, केएल राहुल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेद्र चहल, रिषभ पंत.
महत्त्वाच्या बातम्या-
–पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटला बसला हा मोठा धक्का
–विश्वचषकात टीम इंडियाने पाकिस्तानबरोबर खेळायला नको
–चाहत्यांकडून एबी, कोहलीच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक, पहा व्हिडीओ