मुंबई | गुरुवारी(7 मार्च) बीसीसीआयसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेल्या समितीने भारतीय क्रिकेटपटूंच्या 2018-19 या मोसमातील वार्षिक मानधन कराराची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार मागील वर्षीप्रमाणेच या वर्षीही मानधनाच्या 4 श्रेणी करण्यात आल्या आहेत. यात अ+, अ, ब, आणि क अशा श्रेणी असतील.
या करारानुसार अ+ श्रेणीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 या कालावधीसाठी 7 कोटी रुपयांचे मानधन मिळेल.
त्याचबरोबर शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमारला मात्र अ+ श्रेणीतून वगळण्यात आले असून त्यांचा अ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. शिखर सप्टेंबर 2018पासून कसोटी क्रिकेटपासून दूर आहे. त्याला मागील वर्षी इंग्लंड दौऱ्यात चार कसोटी सामन्यात 20.25 च्या सरासरीने फक्त 162 धावा करता आल्या होत्या.
भारतीय कसोटी संघातील स्टार यष्टीरक्षक रिषभ पंतला सातत्यपुर्ण कामगिरीचे फळ म्हणून करारात पहिल्यांदाच स्थान देण्यात आले. त्याला थेट अ गटात स्थान देण्यात आले.
हनुमा विहारी आणि खलील अहमदला मात्र पहिल्यांदाच क गटात स्थान देण्यात आले आहे. मुरली विजय आणि सुरेश रैनाला मात्र या करारातून वगळण्यात आले आहे.
असे असले तरी जबरदस्त कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शाॅ आणि मयांक अगरवालला मात्र कोणत्याही करारात स्थान देण्यात आले नाही. या दोनही खेळाडूंनी शानदार आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
हे आहे कारण-
असे असले तरी हे दोन्ही खेळाडू बीसीसीआयच्या कराराच्या नियमात बसत नाहीत. करारात समावेश करण्यापुर्वी खेळाडूने ३ कसोटी किंवा ८ वनडे सामने खेळलेले हवेत असा एक नियम आहे.
१९वर्षीय पृथ्वी शाॅने मात्र २ कसोटी सामने खेळले आहेत. दुसऱ्या बाजूला मयांक अगरवालच्या नावावरही दोनच कसोटी सामने आहेत. तसेच या दोन्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
दुसऱ्या बाजूला विजय शंकरनेही रांची वनडे मिळून ७ सामने खेळले आहे. त्यामुळे त्याची संधीही थोडक्यात हुकली. परंतु जेव्हा तो ८वा वनडे सामना खेळेल तेव्हा त्याचा लगेच या करारात समावेश करण्यात येईल.
पृथ्वी शाॅ आणि हनुमा विहारीला मात्र चांगलीच वाट पहावी लागणार आहे. कारण या दोन खेळाडूंना वनडेत संधी देण्यात आलेली नाही आणि भारतीय संघ पुढचा कसोटी सामना थेट ६ महिन्यांनी खेळणार आहे.
या पुरुष क्रिकेटपटूंचा झाला वार्षिक मानधन करारात समावेश-
अ+ श्रेणी – विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा
अ श्रेणी – आर अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, शिखर धवन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, कुलदीप यादव, रिषभ पंत.
ब श्रेणी – केएल राहुल, उमेश यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या.
क श्रेणी – केदार जाधव, दिनेश कार्तिक, अंबाती रायडू, मनीष पांडे, हनुमा विहारी, खलील अहमद, वृद्धिमान साहा
या महिला क्रिकेटपटूंचा झाला वार्षिक मानधन करारात समावेश-
अ श्रेणी – मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्म्रीती मंधाना आणि पूनम यादव
ब श्रेणी – एकता बिष्त, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, दिप्ती शर्मा आणि जेमिमा रोड्रिगेज
क श्रेणी – राधा यादव, डी हेमलता, अनुजा पाटिल, वेदा कृष्णमूर्ती, मानसी जोशी, पूनम राउत, मोना मेश्राम, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर आणि तानिया भाटिया.






